#Crime : अखेर बनावट सह्या प्रकरणात ठेकेदारावर गुन्हा दाखल 

#Crime : अखेर बनावट सह्या प्रकरणात ठेकेदारावर गुन्हा दाखल 

सोलापूर : महापालिका अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून खोटी बिले सादर करून 1 लाख 97 हजार 838 रुपयांची रक्कम हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात ठेकेदार सतीश सुभाष इरकल (रा. बुधवार पेठ, वड्डार गल्ली, सोलापूर) याच्यावर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नगरसेवकांनी प्रकरण आणले उघडकीस
महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय भरत धनशेट्टी (वय 52, रा. विजय हौसिंग सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. बनावट सह्या करून गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातील दोषींवर चौकशीअंती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त दीपक तावरे यांनी मंगळवारी दिले होते. सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि विभागीय अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्याचा प्रकार नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि चेतन नरोटे यांनी महापालिकेच्या सभेत उघडकीस आणला होता. त्यावर जोरदार चर्चा झाली आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वच सदस्यांनी केली होती. 

दुसऱ्याने केलेल्या कामाचे बिल केले सादर
महापालिकेने मराठा वस्ती परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 7 मार्च 2019 रोजी निविदा उघडली होती. श्री जयमाता कंट्रक्‍शन यांची निविदा मंजूर करण्यात आली होती. मंजूर झालेले काम पूर्ण करून त्यांनी 1 लाख 50 हजार 164 रुपयांचे देयक (बिल) महापालिकेच्या मुख्य लेखा परिक्षकांकडे सादर केले आहे. असे असतानाही सायली इंटरप्रायझेसचा मालक सतीश इरकल याने महापालिका अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून, दिशाभूल करून बिल फॉर्मवर महापालिकेच्या कार्यालयातून शिक्के मारून घेतले. त्यावर अवेक्षक अविनाश कामत, विभागीय अधिकारी मोहन कांबळे, सार्वजनिक अभियंता संजय धनशेट्टी यांच्या बनावट सह्या केल्या. श्री जयमाता कंट्रक्‍शन कंपनीने केलेले आपण आपण केल्याचे भासवून सायली इंटरप्रायझेसच्या सतीश इरकल याने 1 लाख 97 हजार 838 रुपयांची बिल परस्पर सादर करून रक्कम हडपण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक राजप्पा चानकोटी तपास करीत आहेत. 

 
याप्रकरणात आरोपी सतीश इरकल याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? हे चौकशीतून समोर येईल. 
- बजरंग साळुंखे, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सदर बझार पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com