कटफळ शिवारात दोन वाहनांची समोरासमोर धडक ! पोलिस शिपायाचा जागीच मृत्यू; कुटुंबातील चारजण गंभीर

उमेश महाजन
Thursday, 21 January 2021

महूद - दिघंची रस्त्यावरील कटफळ (ता. सांगोला) शिवारात बुधवारी (ता. 20) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कळस (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील पोलिस शिपाई गणेश जरांडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासमवेत प्रवास करणारे इतर चारजण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

महूद (सोलापूर) : महूद - दिघंची रस्त्यावरील कटफळ (ता. सांगोला) शिवारात बुधवारी (ता. 20) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कळस (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील पोलिस शिपाई गणेश जरांडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासमवेत प्रवास करणारे इतर चारजण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. 

कळस (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील पोलिस शिपाई गणेश बलभीम जरांडे (वय 32) हे नवी मुंबई येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. पत्नी, मुलगा, बहीण व मेहुणा यांना सोबत घेऊन चारचाकी वाहनाने सुटीचा आनंद घेण्यासाठी हे सगळे कोकणात गणपतीपुळे येथे गेले होते. सुटीचा आनंद घेऊन घरी परतत असताना सांगोला तालुक्‍यातील कटफळ शिवारात बुधवारी (ता. 20) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चारचाकी वाहनाला (क्र. एमएच 12 सीडी 885) भरधाव वेगाने आटपाडीकडे निघालेल्या चारचाकी वाहनाने (क्र. एमएच 25 आर 0081) समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलिस शिपाई गणेश जरांडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी सोनाली जरांडे, मुलगा, बहीण व मेहुणा या चौघांना जोरदार मार लागला असून, यातील लहान मुलगा सोडून इतर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या चौघांवर अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

जोराची धडक दिलेल्या गाडीच्या चालका विरोधात बेजबाबदारपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री दीड वाजता झालेल्या या अपघाताच्या आवाजामुळे रस्त्याकडेला वस्ती असणाऱ्या युवकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्वरित शासकीय रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पोचवण्यास मदत केली. या घटनेचा तपास सांगोला पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप वसगडे हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A policeman died on the spot in an accident in Katphal village