डाळिंबाचे दर कोसळले मागील वर्षीच्या तुलनेत भाव निम्म्यावर, तेल्या रोगाचाही प्रादुर्भाव 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 9 August 2020

डाळिंबाची आवक आता बाजारात सुरू झाली आहे. मात्र यावर्षी तेल्या आजाराचा प्रादुर्भाव झालेला माल खूप अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे या मालाला व्यापाऱ्याकडून भाव मिळत नाही.

सोलापूर : येथील बाजारपेठेत डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर डाळिंबाला 60 रुपये प्रति किलो भाव मिळू लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भाव निम्म्याने कमी झाले आहेत. लॉकडाउनचे अडथळे व इतर अडचणीमुळे भावाची घसरण झाली आहे. डाळिंबाची आवक आता बाजारात सुरू झाली आहे. मात्र यावर्षी तेल्या आजाराचा प्रादुर्भाव झालेला माल खूप अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे या मालाला व्यापाऱ्याकडून भाव मिळत नाही. 

मोठा आकार असलेली व निरोगी डाळिंबाना साठ ते सत्तर रुपये किलोपर्यंत भाव मिळाला. हा माल परराज्यातील बाजारपेठामध्ये पॅकिंग करून पाठवला जात आहे. मध्यम दर्जाची व काही प्रमाणात रोगट झालेली फळांना भावच मिळाला नाही. या मालाची किमंत अगदी दोन रुपयापासून पंचवीस रुपये किलोपर्यंत केली जात आहे. तेल्या झालेल्या फळांमुळे काही फळात बाहेरून काळे तेलकट डाग दिसतात. काही फळामध्ये आतूनही काही भाग खराब होतो. खरडा असलेला डाळिंबाना देखील भाव कमी मिळत आहे. कमी पिकलेली हिरवट डाळिंब व चट्टा असलेल्या मालाला देखील भाव मिळत नाहीत. 

यावर्षी पहिल्यांदाच जून व जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने डाळिंबाच्या नुकसानीत भर पडली. तेल्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी उपाययोजना देखील पावसाने अपुरी पडली. या उलट पावसाने डाळिंबाचे नुकसान देखील अधिकच झाले आहे. खराब झालेल्या मालाला अगदी वीस रुपये किलोपर्यंत कसाबसा भाव मिळतो आहे. त्यामुळे या वर्षी डाळिंब उत्पादकांना तेल्या व झालेल्या पावसाने हे नुकसान झाले आहे. 

सध्या बाजारात दररोज दहा ते बारा हजार कॅरेट डाळिंबाची आवक सुरू झाली आहे. अहमदनगर, सोलापूर व पूणे भागातून मालाची आवक सुरू झाली आहे. सध्या हा माल आंध्र प्रदेशमध्ये पॅकिंग करून पाठवला जात आहे. उत्पादकाकडे दर्जेदार मालाची काही प्रमाणात कमतरता असल्याने रोगट माल कमी भावाने द्यावा लागत आहे. मागील वर्षी डाळिंबाला 130 ते 150 रुपये प्रति किलो एवढे भाव होते. यावर्षी मात्र भाव निम्म्याने कमी झाले आहेत. या हंगामात लॉकडाउनच्या संदर्भात इतर राज्यातील बाजारपेठा अधिक क्षमतेने सुरू होतील. त्यावेळी डाळिंबाचे भाव काही प्रमाणात वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate prices plummeted due to lockdown and other difficulties