शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली ! सोलापूर बाजार समितीत 99 क्रेट डाळिंबाची पट्टी "वजा 2800 रुपये'!

महेश पाटील 
Saturday, 24 October 2020

येथील एका शेतकऱ्याने मार्केटला पाठवलेल्या 99 क्रेट डाळिंबाला वजा दोन हजार 800 रुपये एवढी पट्टी आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. परतीच्या पावसापूर्वी त्याच डाळिंबाची 30 ते 40 रुपये किलो दराने मागणी झाली होती. 

सलगर बुद्रूक (सोलापूर) : येथील एका शेतकऱ्याने मार्केटला पाठवलेल्या 99 क्रेट डाळिंबाला वजा दोन हजार 800 रुपये एवढी पट्टी आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. परतीच्या पावसापूर्वी त्याच डाळिंबाची 30 ते 40 रुपये किलो दराने मागणी झाली होती. 

सलगर बुद्रूक (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी अशोक जाधव यांच्याकडे दोन हजार गणेश वाणाच्या डाळिंबाची झाडे आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 99 क्रेट डाळिंब विक्रीसाठी पाठवले होते. त्या डाळिंबाची विक्री झाल्यानंतर दुकानदाराच्या औषधाची बाकी भागवायची त्यांनी ठरवले होते. पण, डाळिंबाची पट्टी जेव्हा त्या शेतकऱ्याने पाहिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते डाळिंब विकून पैसे यायचे तर सोडाच उलटपक्षी वाहतूक भाडे त्यांच्यावर बसले. वाहन चालकास पदरचे पैसे द्यावे लागले. दरम्यान, औषधाच्या बाकीचा भार त्यांच्या डोक्‍यावर तसाच राहिला. 

परतीच्या पावसाने मोठे नुकसान 
परतीच्या पावसापूर्वी या शेतकऱ्याच्या डाळिंबाला 30 ते 40 रुपये किलोप्रमाणे मागणी झाली होती. पण, मध्येच आठवडाभर पाऊस लागल्यामुळे सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे डाळिंब व्यापारी बागेकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे मालाची नासाडी होत असल्याचे पाहून या शेतकऱ्याने आपले डाळिंब सोलापूर मार्केटला पाठवले. 30-40 रुपये किलोने जाणारे डाळिंब परतीच्या पावसाच्या काळात मार्केट पडल्यामुळे फुकट देण्याची वेळ त्या शेतकऱ्यावर आली. दरम्यान, परतीच्या पावसामुळे सलगर बुद्रूक व परिसरातील डाळिंब बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बागांमध्ये कुजलेल्या व सडलेल्या फळांचा सडाच पडला आहे. 

शासकीय मदत तोकडी 
सलगर बुद्रूक परिसरामध्ये डाळिंब बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकेका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा होती. पण, हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत करून प्रशासनाने शेतकऱ्यांची चेष्टा केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रशासनाने आणखी भरीव मदत शेतकऱ्यांना करणे गरजेचे आहे. 

याबाबत डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक जाधव म्हणाले, माझ्याकडे दोन हजार डाळिंबाची झाडे आहेत. पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीतून वाचून राहिलेले 99 क्रेट डाळिंब सोलापूरला पाठवले होते. पण त्या डाळिंबाची कवडीमोल दराने विक्री झाल्याने वाहन चालकाचे भाडे स्वतःच्या खिशातून मला द्यावे लागले. डाळिंबाला दर मिळत नसल्याने माझ्यासह सलगर बुद्रूक परिसरातील सर्व शेतकऱ्यांची यावर्षी खूप वाईट अवस्था झाली आहे. उत्पादन खर्चाचा भार शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने हेक्‍टरी 50 हजार रुपयांपर्यंतची मदत सरसकट जाहीर करावी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate prices in Solapur Bazar Samiti have come down drastically, raising concerns among farmers