esakal | पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून साधना भोसले ! जयश्री भालके, शैला गोडसे, भोसले यांच्यात लढतीची शक्‍यता

बोलून बातमी शोधा

pdr womens

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. 

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून साधना भोसले ! जयश्री भालके, शैला गोडसे, भोसले यांच्यात लढतीची शक्‍यता
sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर भाजपकडूनही महिला उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये भाजपकडून आमदार प्रशांत परिचारक यांच्या कट्टर समर्थक पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे नाव आघाडीवर आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारली तर अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भालके, भोसले आणि गोडसे अशी तिरंगी लढत होण्याची शक्‍यता राजकीय जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे. 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे येथील पोटनिवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी समजली जात असली, तरी ती तितकी सोपी राहिली नसल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार प्रशांत परिचारक आणि उद्योगपती समाधान आवताडे यांचीही भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. आमदार भारत भालके यांचे या मतदार संघावर गेल्या 11 वर्षांपासून वर्चस्व होते. 2009 मध्ये पहिल्यांदा त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचाही त्यांनी पराभव करून आपली ताकद दाखवून दिली होती. 

2019 मध्ये राज्यात भाजपची लाट असतानाही ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकर परिचारक यांचाही त्यांनी धक्कादायक पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक साधली. 
निवडणुकीनंतर एक वर्षामध्येच आमदार भारत भालके यांचे व माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे निधन झाले. त्यामुळे मतदारसंघात ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. भालकेंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ तर सुधाकर परिचारकांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारकांकडे त्यांच्या गटाचे नेतृत्व आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये आमदार भारत भालकेंचे पुत्र भगीरथ की त्यांच्या पत्नी जयश्री, या दोन नावांवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी जयश्री भालकेंना उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. 

जयश्री भालकेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात भाजपकडून नगराध्यक्षा साधना भोसले किंवा त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्‍यता आहे. भोसलेंच्या उमेदवारीसाठी आमदार प्रशांत परिचारक देखील आग्रही असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनीही भाजपशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने उमेदवारी दिली तर त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची तयारी देखील दाखवली आहे. तरीही परिचारक समर्थक नगराध्यक्षा साधना भोसले यांचे नाव सध्या अधिक चर्चेत आहे. नगराध्यक्षपद मिळण्याच्या आधीपासूनच त्या राजकीय व सामाजिक कार्यात अग्रभागी आहेत. त्यांचे पती नागेश भोसले यांचाही मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. 

मागच्या वेळी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला गोडसे यांनी निवडणुकीची तयारी म्हणून मतदारसंघातील दुष्काळी भागातील शेतीला पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्याच प्रयत्नामुळे मंगळवेढा तालुक्‍यातील शिरनांदगी तलावात पाणी आले आहे. दरम्यान, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे पंढरपूरची निवडणूक तिरंगी की चौरंगी होणार? याकडेच लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल