अभ्यास व पर्यटनाला चालना देणारी पोस्टाची इमारत

post office2.jpg
post office2.jpg

सोलापूर ः शहरातील टपाल कार्यालयाची इमारत नीओ क्‍लासिकल प्रकारातील एक दुर्मिळ व पर्यटकांच्या अभ्यासाला चालना देणारी मानली जाते. वेगवेगळी वैशिष्ट्ये घेऊन उभी असलेली ही इमारत ग्रीक पद्धतीने बांधलेली सोलापुरातील एकमेव इमारत आहे. 
रेल्वे स्थानक परिसरात गेले की आपल्याला समोरील भागात भव्य अशी दगडी इमारत दिसून येते. या इमारतीच्या उभारणीबाबत आता नव्याने सापडलेले संदर्भ महत्त्वाचे मानले जातात. इंग्रजांनी 1818 च्या सुमारास भूईकोट किल्ला जिंकून सोलापूरवर ताबा मिळवला. त्यानंतर 1870 पर्यंत काही भागात घोडदळाचे वास्तव्य होते. तसेच काही अधिकाऱ्यांचे बंगले येथे होते. नंतर लष्करी छावणी हलविल्यावर ही जागा रिकामी झाली. त्यावेळी नव्या पोस्ट ऑफिसची गरज असल्याने ही जागा त्यासाठी देण्याचे ठरले. या इमारतीसाठी मुंबई इलाख्याच्या मुख्य आर्किटेक्‍ट कार्यालयाकडून नीओ क्‍लासिकल बांधकाम शैलीचा नकाशा पाठवला गेला. ही मूळ ग्रीक अभिजात शैली प्रबोधन काळात संपूर्ण युरोपात नव्याने स्वीकारली गेली म्हणून तिला नीओ क्‍लासिकल शैली म्हणून ओळखले जाते. ब्रिटिशांनी या शैलीत लंडन व मुंबईत अनेक इमारती बांधल्या आहेत. तत्कालिन डायरेक्‍टर जनरल ऑफ पोस्ट यांनी 1910 च्या सुमारास या जागेची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी ही जागा बांधकामासाठी निश्‍चित केली. 1913-14 मध्ये या इमारतीचे बांधकाम झाले. 
सोलापूर शहरात नीओ क्‍लासिकल पध्दतीच्या इमारती अगदीच कमी आहेत. त्यामुळे या शैलीच्या संदर्भात पर्यटक व अभ्यासकांना मोठी उत्सुकता असते. त्या दृष्टीने अनेक देशभरातील वास्तू अभ्यासक व पर्यटक या इमारतीला भेट देत असतात. या इमारतीचे वैशिष्ट्ये म्हणजे समोरील दर्शनी भागात अर्धगोलाकार छताचा पोर्च केलेला आहे. तसेच छतावर एक छोटा मनोरा केलेला आहे. हा मनोरा नीओ क्‍लासिकल शैलीमुळे इमारतीच्या आतील भागात उंच छताने वातावरणातील उष्णता कमी जाणवते. तसेच लाकडी खिडक्‍या केलेल्या आहे. छतावरील पाणी वाहून जाण्यासाठी बीडचे पाईप्स वापरलेले आहे. 
आतील प्रशस्त हॉलमध्ये नैसर्गिक हवा, प्रकाश तसेच सर्व प्रकारच्या सोयीसुविधांनी ही इमारत उभारली गेली आहे. तसेच इंग्रजांनी इंडो-ब्रिटिश क्‍लेनियल पध्दतीने अनेक वास्तू उभारल्या आहेत. त्यात ही वेगळ्या शैलीची वास्तू आहे. या वास्तूशैलीमध्ये बाहेरील वातावरणाला प्रतिरोध करत विशिष्ट तापमान राखले जाते. त्यामुळे कोणत्याही तापमान बदलात ही वास्तू मानवी उपयोगासाठी उपयुक्त ठरते. या इमारतीचे वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये लोखंडी खांब व तुळ्यांचा वापर केला आहे. या पध्दतीच्या बांधकाम तंत्राचा उपयोग नंतरच्या काळात सोलापूरकरांनी स्वीकारत या वास्तू शैलीतील आणखी एक बदल स्वीकारल्याचे दिसून येते आहे. संपूर्ण दगडी पध्दतीच्या या इमारतीचे आयुष्य दीर्घ असते. तसेच ते बदलत्या वातावरणात तेथील लोकांना पुरेसे नैसर्गिक संरक्षण देखील मिळवून देते. आतील भागातील इमारतीला असलेली मोठी उंची तापमान थंड ठेवते. 

 
पर्यटकांनी काय पाहावे 

वास्तुशैलीची रचना, मध्यवर्ती मनोरा, दर्शनी भागातील अर्धगोलाकार कमानी, दगडी काम, खांबावर असलेली कलाकूसर, स्थानिक काळा बसाल्ट व हलका राखाडी नेवासा बसाल्ट या दोन्ही दगडांचा संतुलित वापर नीट निरखल्यास लक्षात येतो 

ईमारत स्थापनेच्या काळात बदल  
पोस्ट कार्यालयाची इमारत ही वेगळ्या पध्दतीची तर आहेच. पण त्यासोबत ती देशभरातील पर्यटकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. या इमारतीच्या उभारणीचा काळ 1908 मानला जात असला तरी नव्या अभ्यासानुसार हा कालावधी 1914 चा मानला पाहिजे. 
- सीमंतीनी चाफळकर, ज्येष्ठ वास्तू अभ्यासक, सोलापूर 

सोलापूरचा परगणा महत्वाचा
दुसरे बाजीराव पेशव्यांच्या काळात तीन चतुर्थांश भारतावर मराठ्यांची सत्ता होती. त्यामुळे पेशव्यांना पराभूत करणे इंग्रजासाठी महत्वाचे होते. पेशव्यांचा सोलापूर परगणा अत्यंत महत्वाचा होता. आष्टीची लढाई झाल्यानंतर गणपतराव पानसे व इतरांनी इंग्रजाशी आणखी एक झुंज दिली. सोलापूर हाती लागल्यानंतर इंग्रजांनी महाराष्ट व कर्नाटकसाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून सोलापूर विकसित करण्यास सुरुवात केली. कापड गिरण्या, रेल्वे व अनेक प्रकारच्या इमारती देखील बांधल्या. या इमारती वैशिष्ट्येपूर्ण आहेत. 
- डॉ. लता अकलूजकर, इतिहास संशोधक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com