पोस्टाच्या बचत खात्याला 500 रुपयांची अट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढला आणि प्रत्येकांच्या हाती स्मार्टफोन आला. त्यामुळे टपाल कार्यालये ओस पडल्याचे चित्र असून पोस्टमनची रिक्‍त पदेही मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारने पोस्टमनने ग्राहकांपर्यंत पोचून त्यांच्याशी बॅंकिंग व्यवहार करण्याचेही आवाहन केले होते. मात्र, त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.

सोलापूर : राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील खात्याला कमीत कमी बॅलन्सची अट लागू केल्यानंतर आता पोस्टाच्या (टपाल) बचत खात्यातही किमान 500 रुपये असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तत्पूर्वी बचत खात्यात किमान 50 रुपये असोवत, अशी अट होती. जागतिक मंदीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने मोदी सरकारने 12 डिसेंबरला हा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्‍त होत असून 500 रुपयांपेक्षा कमी रक्‍कम असल्यास वार्षिक शंभर रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. 
बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढला आणि प्रत्येकांच्या हाती स्मार्टफोन आला. त्यामुळे टपाल कार्यालये ओस पडल्याचे चित्र असून पोस्टमनची रिक्‍त पदेही मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारने पोस्टमनने ग्राहकांपर्यंत पोचून त्यांच्याशी बॅंकिंग व्यवहार करण्याचेही आवाहन केले होते. मात्र, त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्‍वभूमीवर आता टपाल कार्यालयाकडील बचत खात्यात किमान 500 रुपये ठेवावेत, असा नियम केल्याने ग्राहकांची पंचाईत झाली आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या नव्या निर्णयाबद्दल खातेदारांनी नाराजी व्यक्‍त केली असून अनेकांनी टपाल कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. 
निर्णयाची अंमलबाजवणी सुरु... 
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता पोस्टाच्या बचत खात्यात 500 रुपये असणे बंधनकारक आहे. यापूर्वी बचत खात्यात 50 रुपये असावेत, असा निकष होता. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून खातेदारांना तसे आवाहन करण्यात आले आहे. 
- सुरेश सिरसी, प्रवर अधीक्षक, सोलापूर टपाल कार्यालय 

ठळक बाबी... 

  • - बचत खात्यात 50 रुपयांचा बॅलन्स असावा हा नियम मोदी सरकारने बदलला 
  • - पोस्टाच्या बचत खात्यात 500 रुपयांपेक्षा कमी रक्‍कम असल्यास 100 रुपयांचा वार्षिक दंड 
  • - सर्वसामान्यांची बचत खाती बंद होण्याची भीती : नव्या खात्यासाठी नागरिकांनी गाठली जवळची बॅंक 
  • - बचत खात्यात 500 रुपये ठेवण्याचे ग्राहकांना अधिकाऱ्यांचे आवाहन : कर्मचाऱ्यांअभावी ग्राहक अनभिज्ञच

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Post savings account of Rs 500