पोस्टमन वडिलांचे स्वप्न पूर्ण करून मोठ्या पदांवर पोचले! तरी गावची नाळ तुटू दिली नाही प्रकाश कुलकर्णींनी 

Prakash Kulkarni
Prakash Kulkarni

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : घरची परिस्थिती मध्यम स्वरूपाची. वडील पोस्टमास्तर. वडिलांची प्रबळ इच्छा होती, की आपल्या मुलांनी अधिकारी होऊन समाजाची सेवा करावी. कुटुंबाचा सर्व आर्थिक बोजा वडिलांवर असल्याने त्यांना हातभार लावण्यासाठी प्रकाश व गणेश हे बंधू शेती बघत-बघत शिक्षण घेत होते. प्रकाश कुलकर्णी हे दहावी व बारावी या दोन्ही बोर्डाच्या परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांनी लगेच वेळ न दवडता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. वयाच्या 18 व्या वर्षी प्रथम पोस्टात नोकरीस लागले. पुढे एका बॅंकेत रुजू झाले. परंतु यात ते समाधानी नव्हते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला अन्‌ वयाच्या 21 व्या वर्षी पोलिस उपनिरीक्षक म्हणून उत्तीर्ण झाले. 

समाजात आज कितीही गरीब वा श्रीमंत असला तरी प्रत्येकाचा उद्देश हा पैसे मिळवणे हाच असतो. गरीब दोन वेळेच्या हातातोंडाची गाठ पडावी यासाठी पैसा मिळवतात, तर उच्चभ्रू पुढच्या पिढ्यांच्या ऐशआरामासाठी पैसे मिळवतात. मात्र याला अपवाद उपळाई खुर्दचे सुपुत्र तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रकाश कुलकर्णी आहेत. प्रकाश कुलकर्णी यांना भाऊ गणेश यांच्यासह तीन बहिणी. लहानपणापासूनच या पाच भावंडांना वडिलांनी चांगले मार्गदर्शन केले. 

प्रकाश कुलकर्णी यांनी पोलिस उपनिरीक्षक म्हणून दोन वर्षे सेवाही बजावली. परंतु "इथे थांबणे नाही' असे म्हणत ते भारतीय नौदलात देखील उत्तीर्ण होऊन रुजू झाले. यशाचा एक-एक डोंगर सहज पार करत असताना, राज्यसेवेतून त्यांची मुख्याधिकारीपदी निवड झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा बजावत अखेर त्यांची नवी मुबंई महानगरपालिकेच्या कर निर्धारण उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. जे हवे होते ते मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अन्‌ त्यांना ते मिळत गेले. हे सगळं होत असताना त्यांनी ज्या मातृभूमीत जन्म घेतला त्याचा विसर पडू दिला नाही. एवढ्या मोठ्या पदावर असून देखील त्यांनी गावची नाळ तुटू दिली नाही. 

त्यांचे बंधू गणेश यांचे अकस्मात निधन झाले. त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक कार्याचा वसा प्रकाश यांनी तसाच अविरतपणे कै. गणेश काका कुलकर्णी प्रतिष्ठानच्या माध्यामातून सुरू ठेवला असून, या कामात त्यांच्या बहीण उपळाईच्या सरपंच बंटीताई कुलकर्णी यांचेही सहकार्य आहे. उपळाई बुद्रूक व खुर्द येथील ओढ्यातील गाळ काढणे, वाड्या-वस्त्यांवरील रस्ते, दुष्काळी परिस्थितीत चार ते पाच महिने स्वखर्चाने मोफत पाणीपुरवठा करून कित्येक गावांचा पाणीप्रश्न मिटवला आहे. तसेच होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत, दूध उत्पादनासाठी दूध शीतकरण केंद्र अशी अनेक विविध समाजोपयोगी कार्ये ते करीत आहेत. खऱ्या अर्थाने प्रकाश कुलकर्णी हे समाजातील गोरगरीब कुटुंबांसाठी आधारवड असून, सर्वांसाठी प्रेरणादायी असेच त्यांचे कार्य आहे. 

मला स्पर्धा परीक्षेची प्रेरणा कै. गणेशकाका कुलकर्णी यांनी दिली. अभ्यास करत असताना संपूर्ण मार्गदर्शन प्रकाश कुलकर्णी यांनी केले. माझ्यासारख्या उपळाई परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांना त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. 
- नागेश कदम, पोलिस उपनिरीक्षक, ठाणे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com