Gram Panchayat Result : वयाच्या नव्वदीतही नातवाचा प्रचार ! आजोबांच्या अथक प्रयत्नांमुळे झरेमध्ये पाटील गटाची सत्तेची हॅट्ट्रिक

अण्णा काळे 
Monday, 18 January 2021

झरे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांनी वयाच्या नव्वदीतही प्रचार प्रमुख युवा नेते प्रशांत पाटील यांचा प्रचार केला, तरीही प्रशांत पाटील यांचा  निसटता  पराभव झाला; मात्र पाटील गटाने सत्तेची हॅट्ट्रिक केली आहे. झरे ग्रामपंचायत निवडणुकीत 11 पैकी 6 जागांवर पाटील गटाला विजय मिळाला आहे. 

करमाळा (सोलापूर) : झरे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांनी वयाच्या नव्वदीतही प्रचार प्रमुख युवा नेते प्रशांत पाटील यांचा प्रचार केला, तरीही प्रशांत पाटील यांचा निसटता पराभव झाला; मात्र पाटील गटाने सत्तेची हॅट्ट्रिक केली आहे. झरे ग्रामपंचायत निवडणुकीत 11 पैकी 6 जागांवर पाटील गटाला विजय मिळाला आहे. चार जागा उद्योगपती नारायण आमृळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब गुळवे, शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या आघाडीला मिळाल्या तर माजी आमदार समर्थक सोमनाथ घाडगे यांनी प्रभाग दोनमधून अपक्ष म्हणून बाजी मारली आहे. 

झरे ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यात यश आले असले तरी पाटील गटाचे युवा नेते प्रशांत पाटील यांचा मात्र पराभव झाला असल्याने "गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था झरे येथे पाटील गटाची झाली आहे. झरे ग्रामपंचायतीत पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांची सत्ता असून, ते सध्या माजी शिवसेना आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर आहेत. गेल्या दहा वर्षांपासून विलास पाटील यांचे नातू युवा नेते प्रशांत पाटील हे गावचा कारभार सांभाळत आहेत. विलास पाटील यांच्या सून सुनीता पाटील या विद्यमान सरपंच आहेत. 

या वेळी प्रशांत पाटील यांची सत्ता घालवायची, या विचारातून उद्योगपती नारायण आमृळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब गुळवे, शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब गायकवाड यांनी एकत्र येत तोडीस तोड असे उमेदवार उभा केले. मात्र त्यांना चार जागांवर समाधान मानावे लागले. नारायण आमृळे यांच्या पत्नी लक्ष्मी आमृळे या प्रभाग एकमधून विजयी झाल्या आहेत. 

विलास पाटील हे कै. नामदेवराव जगताप यांच्यापासून करमाळा तालुक्‍यातील राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी माजी मंत्री कै. दिगंबरराव बागल, माजी आमदार श्‍यामल बागल, माजी आमदार नारायण पटील यांच्याबरोबर काम केले आहे. सध्या त्यांचे वय 90 वर्षे आहे. आपला नातू प्रशांत पाटील यांच्या विरोधात गावातील दिग्गज मंडळींनी उमेदवार दिल्याचे समजताच घरात बसून तब्येतीची काळजी घेणारे विलास पाटील यांनी वयाच्या 90 व्या वर्षी देखील संपूर्ण गाव पिंजून काढत प्रचार केला आहे. वयाच्या नव्वदीत देखील विलास पाटील हे प्रचार यंत्रणेत सक्रिय झाल्याने सर्वांनाच या गोष्टीचे कौतुक वाटत होते. 

या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहा उमेदवार विजयी झाले आहेत; मात्र स्वत: प्रशांत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रभाग क्रमांक चारमधून प्रशांत पाटील यांचा प्रशांत चौधरी यांनी 23 मतांनी पराभव केला आहे. या प्रभागातील मंजुश्री मयूर मुसळे व प्रकाश कोकाटे हे पाटील समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रभाग एकमधून विलास पाटील यांच्या सूनबाई व प्रशांत पाटील यांच्या मातोश्री सुनीता पाटील, विद्यमान सरपंच या विजयी झाल्या असून त्यांनी अनिता बागल यांचा पराभव केला आहे. 

विजयी उमेदवार : पाटील गटाचे मच्छिंद्र घाडगे, सुनीता पाटील, अनिता कांबळे, मैना घाडगे, भारत मोरे, मंजुश्री मुसळे, अपक्ष सोमनाथ घाडगे, विरोधी गटाचे लक्ष्मी आमृळे, राधाबाई बोराटे, प्रशांत चौधरी, सोनाली कोकाटे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prashant Patil lost the Jhare Gram Panchayat elections but his group won