esakal | सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचारांचा वारसा प्रतापसिंह मोहिते- पाटील यांनी जोपसला

बोलून बातमी शोधा

Pratapsingh Mohite Patil A place of inspiration for the youth of Solapur district

जनसेवा संघटना कार्यकर्त्यांचे ट्रेनिंग स्कूल 
1975 साली शंकरराव मोहिते-पाटील यांच्या आशीर्वादाने जनसेवा संघटनेची स्थापना करून कार्यकर्त्यांची एक चालतीबोलती ट्रेनिंग स्कूल त्यांनी सुरू केली. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून तयार झालेले हजारो युवक आजही राज्य व जिल्हा पातळीवर विविध पदांवर विविध राजकीय पक्षात काम करताना दिसत आहेत. 

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचारांचा वारसा प्रतापसिंह मोहिते- पाटील यांनी जोपसला
sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : 25 जून म्हटले की पश्‍चिम महाराष्ट्रातील तरुणांचे पाय आपोआप अकलूजकडे वळत, याला कारणही तसेच होते. पप्पासाहेब म्हणजेच कै. प्रतापसिंह शंकराव मोहिते पाटील यांचा हा वाढदिवस. दुर्दैवाने आज हा दिवस जयंती दिन म्हणून साजरा करावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे पेरणास्थान म्हणून कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याकडे पाहिले जात. 

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचारांचा वारसा प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी शेवटपर्यंत जोपसला. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील गटाची पकड बसवण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यां नेतृत्व पक्के करण्यासाठी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या संघटन कौशल्याद्वारे व वक्तृत्वाने सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, लेबर फेडरेशन, जिल्हा दूध संघ, भुविकास बॅंक आदी संस्था आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन कर्तबगार तरुणांना या पदावर काम करण्याची संधी दिली होती. 
सोलापूर जिल्हा परिषद राज्यामध्ये 28 व्या क्रमांकावर होती ती प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली द्वितीय क्रमांकावर आली होती. सोलापूर जिल्हा परिषदेचे काम करत असताना संपूर्ण राज्यात पारदर्शी व प्रभावी काम करून मोठा नावलौकिक मिळविला होता. जिल्हा परिषदेमधून प्रत्येक वाडी-वस्तीवर विकास होऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या कारकिर्दीत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदारापेक्षा जिल्हा परिषदमधून विकास कामांचा वेग मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. उसावरील झोन बंदी उठवणे, नीरा उजवा कालवा, नीरा देवधर पाण्यासाठी त्यांनी स्वपक्षाविरुद्ध सुद्धा लढा दिलेला राज्याने पाहिला आहे. त्यांचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव या तीर्थक्षेत्राचा व संपूर्ण घाटाचा रोड, गुप्तलिंग याचा विकास केला. 
सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हजारो शाळा खोल्या त्यांनी जिल्ह्यात बांधलेल्या आहेत. युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना स्व. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली होती. रक्तदानाचे कार्य लिम्का बुकमध्ये नोंद होण्याएवढे त्यांनी केले आहे. 
सदाशिवनगर येथील श्री शंकर साखर कारखाना 1250 मेट्रिक टन क्षमतेचा होता तो त्यांनी अडीच हजार मेट्रिक टन क्षमतेचा केला व तीस हजार लिटर क्षमतेच्या आसवनी प्रकल्प उभा करून दिवाळखोरीत निघालेल्या साखर कारखाना प्रथम क्रमांक आणलेला होता. माळशिरस तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने पश्‍चिम भागात उच्चशिक्षणाच्यासाठी नातेपुते येथे 1993 साली महाविद्यालय सुरू केले. नीरा उजवा कालव्यावरील गरजू शेतकऱ्यांना उपसा सिंचन योजना मंजूर करून हजारो एकर जिराईत शेती बागायती केली आहे. पप्पासाहेब यांनी जात, धर्म, राजकारण न पाहता गरजूंना मदत करणे हेच ध्येय कायम ठेवले होते. त्याच्यांकडे कोणी मदत मागण्यास आले तरी त्याचे प्रश्न समजून घेऊन जागेवरच काम मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न असे. ओठावर एक पोटात एक हे त्यांच्याकडे चालत नसे. जे काय असेल ते रोखठोक होते. असा त्यांचा स्वभाव होता. 
आजची राजकीय परिस्थिती पाहता प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाची सर्व क्षेत्रातील लोकांना क्षणोक्षणी आठवण येत आहे. आपले गुरू स्वामी सर्वानंदजी महाराज यांच्या नावे डॉ. एम. के. इनामदार यांच्या हॉस्पिटलमध्ये डायगोनोस्टिक सेंटर सुरू करून त्या ठिकाणी एमआरआय, सिटी स्कॅनची सोय केली आहे. शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढी, लघुऔद्योगिक वसाहत, श्रीराम मंदिर, साई मंदिर यांची उभरणी त्यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. अश्‍या जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रामध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी भरीव काम केले आहे. अनेक वेळ अडचणीच्या प्रसंगी जिल्हा त्यांची आठवण काढतो. आज 25 जून जयंतीनिमित्त प्रतापसिंह मोहिते पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.