मोबाईलचे कव्हर तयार करणाऱ्या बार्शीच्या प्रतीक्षा थोरात 

प्रशांत काळे 
Saturday, 24 October 2020

व्यवसायातून दरमहा 40-50 हजार उलाढाल 
लोकलला व्होकल बनवा ही संकल्पना प्रत्यक्षात रुजवली आहे. कच्चामाल पुणे आणि मुंबई मधून घेतो आणि ऑनलाईन ऑर्डरच्या माध्यमातून वस्तू आसाम, चंदीगढ, कोलकाता, नोएडा, जोधपूर, हैदराबाद, बंगळूर, मदुराई, जोधपूर, लखनौ इत्यादीपर्यंत पोहचलो आहोत. त्यासाठी आम्ही वेबसाईट सुरू केली आहे. व्यवसायातून दरमहा चाळीस ते पन्नास हजार पर्यंतची उलाढाल करत आहोत. सोबत चार महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 
प्रतीक्षा थोरात, नव उद्योजिका, बार्शी. 

बार्शी ः मनामध्ये लहानपणापासून एकच ध्यास होता, उच्च शिक्षण घ्यायचे, स्वतःच्या उद्योग क्षेत्रात झेप घ्यायची, व्यवसायामध्ये सोबत महिलांना प्राधान्य देऊन त्यांनाही रोजगाराची संधी द्यायची. नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त पैसे मिळतात ही मनातली खुणगाठ, स्वतःच्या अंगी असलेल्या कलेचा वापर करुन ग्राहकांच्या पसंतीला येईल, असा व्यवसाय करायचा अन्‌ मोबाईलचे विविध कव्हर तयार करण्याचे काम सुरु केले आणि शहरासह राज्यात ग्राहक लाभले. एकाच वर्षात पाच लाखांची उलाढाल झाल्याची माहिती नव उद्योजिका प्रतीक्षा थोरात यांनी दिली. 

21 व्या शतकात तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांकडे मोबाईल आहे. विशेषतः तरुण-तरुणींमध्ये मोबाईलचे वेगवेगळे आकर्षक कव्हर वापरण्याचा ट्रेंड आहे. हे लक्षात आले होते. यासाठी असे मशिनद्वारे विविध कव्हर तयार करुन त्यांच्या पसंतीस उतरतील असे कव्हर तयार केले. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर नगरपालिकामध्ये दिनदयाळ अंत्योदय योजना शाखेत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कॉन्ट्रॅक्‍ट बेसवर एक वर्ष नोकरी केली. तेथून महिला आर्थिक विकास महामंडळ येथे क्षेत्र समन्वयक म्हणून रुजू झाले. महिला आर्थिक विकास महामंडळ हे महिला सक्षमीकरण राबवतात, यामुळे माझी महिला सक्षमीकरणबद्दल इच्छा आणखी निर्माण झाल्याचेही थोरात यांनी सांगितले. 
एक वर्षापूर्वी अक्षय थोरात यांच्याशी विवाह झाला. जशी माझी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा तशी माझ्या पतीलाही मला सक्षम करण्याची इच्छा होती. माझे एमबीए चालू होते. मोबाईलशी निगडित असा व्यवसाय करावा असे वाटले. माझ्या पतीचे मोबाईल दुकान असल्यामुळे विक्री सहज होईल असे वाटले. मोबाईल कव्हरमध्ये थ्रीडी मोबाईल प्रिंटिंग करावे हे सुचले कारण त्यामध्ये विविध कव्हर बनविता येतात आणि ग्राहकांना आवडेल अशी डिझाईन व फोटोज्‌ कव्हरवर प्रिंट करता येतात. त्यासाठी आम्ही दोन लाख 50 हजार रुपये गुंतविले आणि मशिन खरेदी केली. मोबाईल कव्हरला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही मोबाईल फोन ग्रीपर, कॉफी मग, बॉटल्स, कीचन, कुशन असे विविध प्रकारचे वस्तूंवर प्रिंट करुन विक्रीस सुरुवात केली. प्रथम बार्शीच्या बाजारपेठेमध्ये विकण्यास सुरुवात केली. चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे ऑनलाईन ऑर्डर घेणे सुरू केले. आज राज्यासह इतर राज्यातही वस्तूंना मागणी आहे. 99 रुपयांपासून साडेपाचशे रुपयांपर्यंत डिझाईनच्या वस्तूंची विक्री करीत आहोत. 

संपादन ः संतोष सिरसट  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pratiksha thorat of barshi making a mobile cover