
बार्शी (सोलापूर) : शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या चार शिक्षकांचा 38 लाख 82 हजार 518 रुपये थकीत पगार त्यांच्या परस्पर स्वतःच्या खात्यावर जमा करून अपहार केल्या प्रकरणी बार्शी तालुक्यातील सर्जापूर येथील जय जगदंबा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव, मुख्याध्यापक यांनी दाखल केलेले प्रत्येकी चार गुन्ह्यांतील चार अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी फेटाळले.
बाळासाहेब नरहरी कोरके, जामगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग महादेव कानगुडे यांच्याविरोधात फसवणूक व अन्य कलमान्वये चार गुन्हे माढा पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए. टी. गित्ते यांनी माढा पोलिसांना दिले होते.
समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुदान मिळणाऱ्या जामगाव माध्यमिक आश्रमशाळेत हनुमंत क्षीरसागर, हरी पोटभरे, शिवाजी घुगे, समाधान हजारे हे शिक्षक कार्यरत होते. या शिक्षकांना त्यांचा जून 2010 ते एप्रिल 2013 दरम्यानचा पगार मिळाला नव्हता. त्याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर थकीत पगार 38 लाख 82 हजार 518 रुपये आश्रमशाळेच्या बॅंक खात्यावर 16 डिसेंबर 2013 रोजी जमा करण्यात आला होता. त्यापैकी पांडुरंग कानगुडे याने स्वत: 10 लाख रुपये काढून घेतले तर उर्वरित रक्कम त्याने कोरके याच्या बॅंक खात्यावर भरले असल्याचे उघड झाले.
चार शिक्षकांनी सोसायटीचे कर्ज काढल्याची व त्याच्या परतफेडीसाठी हे पैसे भरल्याची कागदपत्रे तयार केली होती. या शिक्षकांनी सोसायटीचे कर्ज काढलेले नसल्यामुळे त्या दोघांकडे शिक्षकांनी पगाराची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. न्यायालयाने चारही प्रकरणांत कोरके आणि कानगुडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अहवाल 20 नोव्हेंबरपर्यंत सादर करावा, असे आदेश दिले आहेत. गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक करू नये, यासाठी बार्शी जिल्हा सत्र न्यायालयात शुक्रवारी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. शिक्षकांच्या वतीने ऍड. आर. यू. वैद्य, सरकारतर्फे ऍड .दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.