पंढरपूर, सोलापूर, कुर्डुवाडीतून पुण्याला जाणार मतपेट्या ! अशी आहेत तालुकानिहाय मतदान केंद्रे 

तात्या लांडगे 
Monday, 30 November 2020

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एक हजार 970 कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत. तर 62 क्षेत्रीय अधिकारी, 168 अधिकाऱ्यांची 42 भरारी पथके नियुक्‍त करण्यात आली आहेत. 217 सूक्ष्म निरीक्षक, 394 आशा सेविका, शहरासाठी 191 पोलिस कर्मचारी व ग्रामीणसाठी एक हजार 148 पोलिस कर्मचारी असणार आहेत. 197 मतदान केंद्रांवरील प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क, हॅण्डग्लोव्ह्‌ज, फेस शिल्ड दिले जाणार आहे. त्या ठिकाणी 250 थर्मल गन, हॅंडवॉश असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

सोलापूर : जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघा अंतर्गत अक्‍कलकोट सात, बार्शी व पंढरपुरात प्रत्येकी आठ, करमाळा, मंगळवेढा व दक्षिण सोलापुरात प्रत्येकी सहा, माढा, माळशिरस, उत्तर सोलापूर व सांगोल्यात प्रत्येकी सात आणि मोहोळ तालुक्‍यात पाच मतदान केंद्रे आहेत. तर पदवीधरसाठी अक्‍कलकोटमध्ये आठ, बार्शी, माळशिरसमध्ये प्रत्येकी 13, माढ्यात 11, मंगळवेढ्यात नऊ, मोहोळमध्ये सात, उत्तर सोलापुरात 26, पंढरपूर तालुक्‍यात 12, दक्षिण सोलापुरात सहा व सांगोल्यात 10 मतदान केंद्रे आहेत. मतदानानंतर पंढरपूर, सोलापूर व कुर्डुवाडीतून मतपेट्या पुण्याला पाठवल्या जाणार आहेत, अशी माहिती मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

मतदानासाठी एक हजार 970 कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत. तर 62 क्षेत्रीय अधिकारी, 168 अधिकाऱ्यांची 42 भरारी पथके नियुक्‍त करण्यात आली आहेत. 217 सूक्ष्म निरीक्षक, 394 आशा सेविका, शहरासाठी 191 पोलिस कर्मचारी व ग्रामीणसाठी एक हजार 148 पोलिस कर्मचारी असणार आहेत. 197 मतदान केंद्रांवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांना मास्क, हॅण्डग्लोव्ह्‌ज, फेस शिल्ड दिले जाणार आहे. त्या ठिकाणी 250 थर्मल गन, हॅंडवॉश असतील, असेही जिल्हाधिकारी शंभरकर या वेळी म्हणाले. 

मतदारांना मतदान यादीतील त्यांचे नाव शोधण्यासाठी सर्च इंजिन देण्यात आले आहे. सोलापूर, पंढरपूर व कुर्डुवाडी येथून मतदान साहित्य पुण्याला नेण्यासाठी 24 बस, 30 मिनी बस, 14 जीप असतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुणे पदवीधर व शिक्षक आमदारकीसाठी 1 डिसेंबरला मतदान होत असून, 35 शिक्षक उमेदवार तर 65 पदवीधर उमेदवार आहेत. त्यासाठी चार लाख 26 हजार 430 पदवीधर तर 72 हजार 545 शिक्षक मतदार आहेत. मतदान केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून वेटिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. दोन मतदारांमध्ये सहा फुटांचे अंतर असणार असून 98.6 पेक्षा अधिक तापमान असलेल्या मतदाराला वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेवटच्या तासात मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. तर मतदानादिवशी शिक्षकांना नैमित्तिक रजा मिळेल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी म्हणाले... 

  • जास्त गर्दी झाल्यास अतिरिक्‍त मतदारांसाठी असणार वेटिंग रूम 
  • वेब कास्टिंगद्वारे प्रत्येक मतदान केंद्रावरील हालचालींवर राहणार वॉच 
  • सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत चालणार मतदान प्रक्रिया 
  • प्रत्येक मतदान केंद्रावर तापमान तपासणीसाठी असतील स्वतंत्र दोन कर्मचारी 
  • मतदाराचे तापमान 98.6 असावे; जास्त तापमान असलेल्यांना करावी लागणार प्रतीक्षा 
  • सोलापूर जिल्ह्यात पदवीधरचे 53 हजार 813 तर 13 हजार 584 शिक्षक मतदार 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparation of polling stations for teacher and graduate constituency elections is complete