माळशिरस तालुक्‍यातील प्राथमिक शाळांची वाजणार घंटा ! सोमवारी काढणार जनजागृतीपर प्रभातफेरी 

अशोक पवार 
Saturday, 23 January 2021

माळशिरस तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची पंचायत समितीने सुरू केलेली जय्यत तयारी पूर्णत्वाकडे जात आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या आढावा बैठकीतील मार्गदर्शनानुसार बुधवार (ता. 27) पासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली. 

वेळापूर (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची पंचायत समितीने सुरू केलेली जय्यत तयारी पूर्णत्वाकडे जात आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या आढावा बैठकीतील मार्गदर्शनानुसार बुधवार (ता. 27) पासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली. 

इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. शाळा सुरू करण्याच्या संदर्भाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची माळशिरस पंचायत समितीमध्ये आढावा बैठकही झाली होती. त्या अनुषंगाने तालुक्‍यातील पाचवी ते आठवीच्या शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातून पूर्ण झाली आहे. चाचणीचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्यातून शाळा वर्गखोल्या व परिसर स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सुविधा आदी बाबींची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. 

माळशिरस तालुक्‍यातील सर्व माध्यमांच्या पाचवी ते आठवीचे वर्ग असणाऱ्या जिल्हा परिषद - 144, खासगी अनुदानित - 63, स्वयंअर्थसहाय्य - 32, खासगी विनाअनुदानित - 4, आश्रमशाळा - 4, शासकीय आश्रमशाळा - 1, अंशतः अनुदानित - दोन, मदरसा - दोन अशा एकूण 252 शाळा 27 जानेवारीपासून जय्यत पूर्वतयारीनंतर सुरू होत आहेत, असे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी सांगितले. तसेच शाळा सुरू होत असताना पालकांची लेखी संमती, कमी दप्तर, घरचा डबा, सॅनिटायझर, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात धुणे याबाबत दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

सोमवारी जनजागरण प्रभात फेरी 
सोमवार (ता. 25) तालुक्‍यातील प्रत्येक महसुली गावात शाळा सुरू करण्याबाबत जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन केले आहे. प्रभात फेरीत शिक्षक, सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनीही सहभागी व्हावे. 
- स्मिता पाटील, 
गटविकास अधिकारी, माळशिरस 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations were made for the commencement of primary school in Malshiras taluka