अनलॉकच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे मुख दर्शन सरू करण्याची तयारी; वारकऱ्यांना मंदिर सुरू होण्याची प्रतिक्षा 

भारत नागणे 
Wednesday, 16 September 2020

अशी असेल संभाव्य दर्शन व्यवस्था.. 

 • ऑनलाईन दर्शन पास धारकांनाच मुख दर्शन मिळेल 
 • ज्या तारखेचा पास असेल त्याच दिवशी दर्शन मिळेल 
 • मंदिरात प्रवेश करताना भाविकांचे थर्मल स्क्रीनिंग तापमान आणि पल्स मीटरने तापमान घेतले जाईल. योग्य तापमान आणि ऑक्‍सिजनचे प्रमाण असणाऱ्या पास धारकांनाच आत सोडले जाईल 
 • प्रत्येकाचे हात सॉनिटायझरने स्वच्छ केले जातील 
 • एक भाविकामध्ये किमान तीन मीटर अंतर ठेवले जाणार 
 • प्रत्येक तासा फक्त 100 भाविकांनाच दर्शनासाठी सोडणार 
 • दिवसाला किमान 1 हजार लोकांना मुख दर्शनाची व्यवस्था 

पंढरपूर (सोलापूर) : अनलॉक चारनंतर आता राज्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळे खुली करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत. यामध्ये पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर आणि शिर्डीच्या साई संस्थानचाही समावेश आहे. सरकारी पातळीवर चर्चा सुरु झाल्यानंतर येथील विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीनेही दर्शन व्यवस्थेबाबत आपली तयारी सुरु केली आहे. सुरवातीला भाविकांना ऑनलाईन पद्धतीने देवाचे मुख दर्शन देण्याची तयारी मंदिर समितीने दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. या दरम्यान चैत्री, आषाढी या सारख्या मोठ्या यात्रा देखील रद्द कराव्या लागल्या आहेत. मंदिर बंद असल्याने समितीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. या दरम्यानच मंदिर समितीने कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवून भाविकांना दिलासा दिला आहे. 

सहा महिन्यानंतर केंद्र सरकारने अनलॉक चार जाहीर केला आहे. यामध्ये मॉल, हॉटेल, सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतुकीसह अनेक अस्थापने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. अंतर राज्य व अंतर जिल्हा वाहतूक देखील सुरु केली आहे. त्यानंतर आता राज्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळे सुरु करण्याबाबतचा विचार सुरु आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिर समितीनेही दर्शन व्यवस्थेची तयारी सुरु केली आहे. दरम्यान सुरवातीचे काही दिवस पदस्पर्श दर्शन सुरु करणे अशक्‍य असल्याने ऑनलाईन पध्दतीने मुख दर्शन सुरु करता येईल, अशी व्यवस्था समितीने सुरु केली आहे. काही दिवस मंदिरातील निम्या भागाचाच वापर केला जाणार आहे. 

मंदिर समितीने एका तासाला किमान 100 भाविकांना मुख दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली आहे. विठ्ठलाचे मुख दर्शन झाल्यानंतर नैवद्य दरवाजातून रुक्‍मिणी मातेच्या मुखदर्शनासाठी पुढे सोडण्यात येईल. तेथून पुढे व्हीआयपी गेटमधून बाहेर सोडले जाईल. अशी संभाव्य दर्शन बारी देखील तयार केली आहे. 18 तासापैकी किमान 10 तास मुख दर्शन देण्याची तयारी केली असल्याची माहिती मिळाली. 
मंदिर समितीने ऑनलाईन दर्शन पास सिस्टीममध्ये आवश्‍यक काही बदल सुरु केले आहेत. नव्या ऑनलाईन दर्शन पासवर कोविड संदर्भातील अत्यंत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसारच भाविकांना मुख दर्शन दिले जाणार आहे. विठ्ठल मंदिर दर्शनसाठी खुले करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने भाविकांसह स्थानिक व्यापारी व दुकानदारांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

अशी असेल संभाव्य दर्शन व्यवस्था.. 

 • ऑनलाईन दर्शन पास धारकांनाच मुख दर्शन मिळेल 
 • ज्या तारखेचा पास असेल त्याच दिवशी दर्शन मिळेल 
 • मंदिरात प्रवेश करताना भाविकांचे थर्मल स्क्रीनिंग तापमान आणि पल्स मीटरने तापमान घेतले जाईल. योग्य तापमान आणि ऑक्‍सिजनचे प्रमाण असणाऱ्या पास धारकांनाच आत सोडले जाईल 
 • प्रत्येकाचे हात सॉनिटायझरने स्वच्छ केले जातील 
 • एक भाविकामध्ये किमान तीन मीटर अंतर ठेवले जाणार 
 • प्रत्येक तासा फक्त 100 भाविकांनाच दर्शनासाठी सोडणार 
 • दिवसाला किमान 1 हजार लोकांना मुख दर्शनाची व्यवस्था 
 • संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparing to start the darshan of Sri Vitthal Rukmini on the backdrop of Unlock Warakaris waiting for the temple to start