"दहा टक्‍क्‍यां'ची सावकारी संपेना ! व्याजासाठी घरात घुसून महिलेला शिवीगाळ; वाचा गुन्हेगारी वृत्त 

Solapur Crime
Solapur Crime

सोलापूर : आर्थिक अडचणींमुळे भूषण नगरातील नरसम्मा रामलू चलवादी यांनी त्या भागातील कविता चव्हाणकडून नऊ वर्षांपूर्वी तीन टप्प्यात 18 हजार रुपये व्याजाने घेतले. दरमहा अठराशे, तर काही महिन्यांनी नऊशे रुपयांचे व्याज दिले. तरीही दोन महिन्यांचे व्याज दिले नाही म्हणून कविता चव्हाण हिने घरात शिरून शिवीगाळ केली. पोलिस ठाण्यात येताना रिक्षात मारहाण करून चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, अशी फिर्याद चलवादी यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. 

चलवादी यांनी कविता चव्हाणकडून फेब्रुवारी 2011 मध्ये सुरवातीला पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर आठ हजार आणि पुन्हा पाच हजार रुपये, असे एकूण 18 हजार रुपये घेतले. त्यासाठी दरमहा अठराशे रुपयांचे व्याज ठरले. काही महिन्यांनी चलवादी यांनी व्याजासोबत एक हजार रुपये मुद्दल घेण्याची विनंती केली. त्या वेळी कविता चव्हाणने त्यांना एकरकमी मुद्दल दे, नाहीतर दरमहा व्याज दे, असे बजावले.

पाच वर्षांपूर्वी चलवादी यांची सासू मयत झाली. त्यानंतर चलवादी यांनी मुद्दलातील एक हजार रुपये दरमहा घेण्याची पुन्हा विनंती केली. त्यानुसार अडीच वर्षे मुद्दल दिले. त्यानंतरही 18 हजार रुपये दे, नाहीतर दरमहा नऊशे रुपये व्याज देण्यास सांगितले. कविता चव्हाणने चलवादी यांचा कोऱ्या कागदावर अंगठा घेतला. त्याच्या भीतीने व्याज द्यावे लागले, परंतु लॉकडाउनमुळे दोन महिने व्याज देता आले नाही. त्या वेळी कविता चव्हाण ही घरी आली आणि शिवीगाळ केली, असेही फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार श्री. पवार हे करीत आहेत. 

चालकानेच पळविले टिपरचे टायर ! 
पुण्यातील जांबे (ता. मुळशी) येथील अंकुश बाळू गायकवाड यांचा टिपर (एमएच- 14, जीयु- 1132) केगाव येथील शिंदे डेव्हलपर्स येथे लावला होता. टिपर चालक कैलास दत्तू पाटील (रा. पिंपळकाटे, जि. जळगाव) याने मालकाचा विश्‍वास संपादन केला. मात्र, त्याने 2 ते 22 ऑक्‍टोबर या काळात टिपरची 60 हजार रुपये किमतीचे चार टायर लंपास केले. मालकाला ओळखता येऊ नये म्हणून चालकाने जुने खराब टायर टाकले. या कामात त्याला बाबूलाल अकबर शेख याने मदत केल्याची फिर्याद गायकवाड यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक श्री. डाके पुढील तपास करीत आहेत. 

पैशाच्या देवाण-घेवाणीवरून मारहाण 
गैबीपीर नगरातील कपिल जाधव व बाबूलाल जाधव या दोघांनी पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची फिर्याद यल्लपा मरगू जाधव (रा. भैरु वस्ती, लिमयेवाडी) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. दोघे घरी आल्यानंतर झालेल्या भांडणात मोबाईल गहाळ झाला. तर घरासमोरील मासे भरलेले 16 किलोचे क्रेट फोडल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. शेजारील अविनाश जाधव हे भांडण सोडविण्यासाठी आल्यानंतर त्यांनाही त्या दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचे यल्लपा जाधव यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. घाटे करीत आहेत. 

बेशिस्त वाहनचालकांना साडेदहा लाखांचा दंड 
शहरतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने शहर पोलिसांनी सात पोलिस ठाण्याअंतर्गत सातत्याने बेशिस्त वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. 17 ऑगस्टपासून आजवर पोलिसांनी बेशिस्त वाहनचालक आणि विनामास्क फिरणाऱ्यांकडून तब्बल साडेदहा लाखांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर, बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com