माळशिरसमधील 16 हजार हेक्‍टर ऊस गाळपासाठी; मात्र उभ्या उसाचा प्रश्‍न कायम !

सुनील राऊत 
Tuesday, 15 September 2020

माळशिरस तालुक्‍यातील उभ्या उसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. कारण, दोन साखर कारखाने बंद आहेत. त्यापैकी चांदापुरी येथील साखर कारखाना सुरू होणार आहे. तरीही उभ्या उसाचा प्रश्न ऊस उत्पादकांच्या पुढे कायमच राहणार आहे. 

नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यामध्ये यंदा सुमारे 16 हजार हेक्‍टरवरील ऊस गाळपासाठी जाणार असून, सहा हजार हेक्‍टरवर नवीन उसाची लागवड झालेली आहे. तसेच यंदा तालुक्‍यातील खरीप हंगामही समाधानकारक आहे. 

माळशिरस तालुक्‍यातील उभ्या उसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. कारण, दोन साखर कारखाने बंद आहेत. त्यापैकी चांदापुरी येथील साखर कारखाना सुरू होणार आहे. तरीही उभ्या उसाचा प्रश्न ऊस उत्पादकांच्या पुढे कायमच राहणार आहे. माळशिरस तालुक्‍यातील ऊस उत्पादकांना फलटण, माढा, बारामती, इंदापूर या तालुक्‍यांतील शरयू, बारामती ऍग्रो, माळेगाव, भवानीनगर, विठ्ठल सहकारी, इंदापूरच्या शंकरराव बाजीराव साखर कारखान्यावर तसेच स्वराज, श्रीराम आणि राजेवाडी या कारखान्यांवर विसंबून राहावे लागत आहे. 

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून यंदा सुरू व्हावा, ही ऊस उत्पादकांची भावना आहे. परंतु, एकूण आर्थिक ताळेबंद पाहता यंदाही "श्री शंकर' सुरू होईल, याची शाश्वती मात्र नाही. माळशिरस तालुक्‍यात वीर, भाटघर, उजनी धरणाचे पाणी येत असल्याने सर्व क्षेत्र कोणत्या ना कोणत्या योजनेच्या पाण्यासाठी खाली आहे. धरणाच्या पाण्यामुळे बागायती झालेले आहे. 

19 हजार हेक्‍टरवर खरिपाची पिके 
तालुक्‍यात बाजरीची 6 हजार 993 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मका 10 हजार 511 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. एकूण तृणधान्यांची पेरणी 18 हजार 275 हेक्‍टर झालेली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे यांनी दिली. यंदाच्या खरीप हंगामात तूर, उडीद, मूग या कडधान्यांची पेरणी 204 हेक्‍टरवर झालेली आहे. तसेच भुईमूग 46 हेक्‍टर, सूर्यफूल 8 हेक्‍टर, सोयाबीन 190 हेक्‍टर अशी एकूण गळीत धान्यांची पेरणी 245 हेक्‍टरवर झाली आहे. तालुक्‍यात एकूण खरीप हंगामाची पेरणी 19 हजार 69 हेक्‍टरवर झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The problem of sugarcane threshing on sixteen thousand hectares in Malshiras remains