रस्ता खोदाईने सोलापूरवासियांचे मोडले कंबरडे 

Samrt City solapru working
Samrt City solapru working

दक्षिण सोलापूर ः महापालिकेतर्फे स्मार्ट सिटीच्या कामासोबतच शहरातील ड्रेनेज लाईन बदलण्यासाठीच्या कामामुळे शहरातील गल्लीबोळासह प्रमुख रस्त्यांची खोदाई गतीने सुरू आहे. दुरूस्ती मात्र विलंबाने होत असल्याने शहरवासियांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. सोलापूर शहरात महापालिकेच्यावतीने एकाच वेळी कामाचा धडाका सुरू आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक कामे सुरू असतानाच ड्रेनेज लाईन बदलण्याच्या कामाने शहरातील सर्व रस्त्यांवर खोदाई सुरू झाल्याने नागरिक वैतागून गेले आहेत. नागरिकांना सतत धुळीशी सामना करावा लागत आहे. 

कंत्राटदाराकडून खोदाईची कामे गतीने होतात. मात्र, दुरूस्तीच्या कामाला महिनोनमहिने लागत असल्याने भीक नको पण कुत्रे आवर अशी आवस्था नागरिकांची झाली आहे. सध्या शहराच्या मध्यवर्ती भागातील चौपाड, मधला मारुती, सराफ कट्टा, टिळक चौक, मेनरोड, मंगळवार पेठ, डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, बुधवार पेठ, रामलाल चौक, भैय्या चौक, नवी पेठ,दत्त चौक, समाचार चौक, साखर पेठ, कुंभारवेस, कोंतम चौक, लक्ष्मी मंडई, पंचकट्टा, सिध्देश्‍वर पेठ, बेगमपेठ, किडवाई चौक या परिसरात रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. खोदाईवेळी जुने ड्रेनेज फुटून घाण पसरत आहे. काही ठिकाणी नळजोड तुटल्याने वाद निर्माण होत आहेत. तुटलेली नळजोडणी कंत्राटदाराकडून दिली जात नसल्याने अनेकांना नळजोडणीसाठी नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे. मोठे खड्डे पडल्याने पादचाऱ्यांनाच त्रास होत असल्याने वाहन चालवणे तर महाकठीण झाले आहे. या कामामुळे अनेक मार्ग बंद झाल्याने पर्यायी मार्गावर वाहनांची कोंडी होत आहे. त्याचाही त्रास वाहनचालकांसह नागरिकांना होत आहे. अनेक भागात खोदाई केलेल्या रस्त्याची दुरूस्तीच न झाल्याने उखडलेल्या स्थितीतील रस्त्यामुळे छोटे मोठे अपघातही होत आहेत. याबाबत शहरवासियांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

यासंदर्भात जयश्री नंदी यांनी सांगितले की, एक तर रस्त्याचे काम सुरू झाल्याने धुळीचा अत्यंत त्रास होत आहे. आता दसरा दिवाळीचे सण जवळ आले असून मार्केटचा सिझन आहे. ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. नेमक्‍या या कामामुळे ग्राहकांना दुकानापर्यंत पोहोचण्याची अडचण झाली आहे. 

रियाज सिंदगी यांनी सांगितले की, मागील पंधरा दिवसापासून दुकानासमोरील रस्त्यावर काम सुरू झाले आहे. वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्याचे रखडलेलं काम तातडीने पूर्ण करावे, म्हणजे ग्राहकांना ये जा करणे सोपे होऊ शकेल. 

अनिकेत गांधी, यांनी सांगितले की, मागील किती तरी दिवसापासून रस्त्यावरचे काम काढले आहे. हे काम करताना निदान ग्राहकांना ये जा करण्यासाठी थोडा रस्ता ठेवण्याची गरज होती. धुळीने व्यापाऱ्यांचा माल खराब होत आहे. काम कधी पूर्ण होणार हेही माहित नाही. 

शुभम किशोर मेहता, यांन सांगितले की, काही दुकानदाराकडे औषधीसारखी अत्यावश्‍यक सेवा आहे. रस्ते खोदून ठेवले तर तातडीची सेवा देण्यात अडचणी येतात. धुळीचा अत्यंत त्रास होत आहे. 

दत्तात्रय कुसेकर, सांगितले की, मागील चार महिन्यापासून या कामाने आमच्या व्यवसायावर एक प्रकारे लॉकडाउन लादला आहे. दुकानाला पायरी एवढी जागा ठेवली नाही. काम कधी पूर्ण होणार ते ही माहिती नाही. शेती बियाणांच्या हंगामात नुकसान झाले आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

महराष्ट्र सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com