सिद्धेश्‍वर यात्रेतील नंदीध्वज असे होतात तयार ! तीस फुटी बांबूवर केल्या जातात दोन वर्षे विविध प्रक्रिया 

प्रकाश सनपूरकर 
Monday, 11 January 2021

नंदीध्वज तयार करण्यासाठी सरळ बांबूची निवड करावी लागते. त्यासाठी लागणारे बांबू आंध्र प्रदेशातील आतमपूर, बायानोटी, कर्नुल भागातून आणले जातात. तसेच पुण्याजवळ भोर, हिरदोसी, महाड आदी भागातून देखील ते मिळतात. किमान तीस फूट लांबीचे हे बांबू निवडले जातात... 

सोलापूर (सोलापूर) : येथील नागनाथ कलंत्रे यांच्या कुटुंबात मागील एक शतकापासून नंदीध्वज तयार करण्याची सेवा अव्याहतपणे सुरू आहे. नंदीध्वजाची निर्मिती करून ते यात्रा - उत्सवासाठी उपलब्ध करून देतात. याबाबत नागनाथ कलंत्रे यांनी "सकाळ'शी बोलताना नंदीध्वज निर्मितीचा प्रवास उलगडून सांगितला. नंदीध्वजांच्या तयारीचे काम पूर्वी त्यांचे वडील सिद्धप्पा कलंत्रे हे करीत असत. त्यालाही शंभर वर्षाचा काळ लोटला. तेव्हापासून ही कला पुढे नागनाथ कलंत्रे यांच्याकडे आली.

नंदीध्वज तयार करण्यासाठी सरळ बांबूची निवड करावी लागते. त्यासाठी लागणारे बांबू आंध्र प्रदेशातील आतमपूर, बायानोटी, कर्नुल भागातून आणले जातात. तसेच पुण्याजवळ भोर, हिरदोसी, महाड आदी भागातून देखील ते मिळतात. किमान तीस फूट लांबीचे हे बांबू निवडले जातात. तसेच त्याच्या खालील व वरच्या भागातील जाडीदेखील योग्य प्रमाणात हवी असते. खालच्या बाजूला 6 ते 8 इंच जाडी असावी लागते, तर वरच्या बाजूला 2 ते 2.6 इंच बांबू असावे लागतात. हे बांबू पोकळ नसावेत, तर कमी खोलीचे असावेत, या पद्धतीने तपासून घेतले जातात. 

या बांबूंना करंगळी एवढ्या आकाराचे होल मारून ठेवले जाते. प्रत्येक पेऱ्यात एक होल मारून ठेवल्यावर आठ दिवस त्याला कोठेही बाक येऊ नये, अशा पद्धतीने सांभाळले जाते. नंतर या बांबूच्या प्रत्येक पेऱ्यामध्ये शेंगा तेल, करडई किंवा सरकी तेल टाकले जाते. या तेलामध्ये हळद पावडर, पेंडीची पावडर किंवा समुद्राची वाळू घालतात. हळद पावडर टाकल्यामुळे त्यास कीड लागत नाही, तर वाळू घातल्याने नंदीध्वजाचे वजन वाढण्यास मदत होते. 

हे सर्व झाल्यानंतर एका नंदीध्वजाला 8 ते 10 किलो गॅल्व्हनाईज्ड तार तीन इंच अंतर ठेवून स्प्रिंगसारखी गुंडाळावी लागते. तार गुंडाळून झाल्यावर ते एखाद्या उंच झाडास शेवटी वजनी दगड बांधून लोंबकळत ठेवतात. त्यामुळे त्याचा सरळपणा टिकून राहतो. ही सर्व कामे एक ते दोन वर्षे चालतात. त्यानंतर हे नंदीध्वज उन्हात वाळवून यात्रेमध्ये वापरता येतात. 

होल मारताना घ्यावी लागते काळजी 
या नंदीध्वजाला होल मारताना अतिशय काळजी घ्यावी लागते. तसेच तेल घालताना पूर्ण रकाना भरला की नाही, ते दोन-तीनवेळा फुंकर किंवा काडी घालून पाहावे लागते. कारण, त्यामध्ये हवा राहण्याची शक्‍यता असते. श्री सिद्धरामेश्‍वरांच्या सेवेसोबत श्रीक्षेत्र नागनाथ देवस्थान, धोत्री येथे देखील नंदीध्वजाची सेवा देत असल्याचे नागनाथ कलंत्रे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The process of making Nandi Dhwaja in Siddheshwar Yatra lasts for two years