राज्यात कॉंग्रेस सत्तेत असतानाही पंढरपुरात कार्यकर्त्यांची वानवा ! प्रमुख पदाधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ 

भारत नागणे 
Saturday, 31 October 2020

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेचा वाटेकरी असलेला कॉंग्रेस पक्ष अजूनही ग्रामीण भागात चाचपडतोय. सत्तेत अनेक महत्त्वाची आणि मलईदार खाती असूनही कार्यकर्त्यांची मात्र वानवा असल्याचे चित्र आहे.

पंढरपूर (सोलापूर) : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेचा वाटेकरी असलेला कॉंग्रेस पक्ष अजूनही ग्रामीण भागात चाचपडतोय. सत्तेत अनेक महत्त्वाची आणि मलईदार खाती असूनही कार्यकर्त्यांची मात्र वानवा असल्याचे चित्र आहे. 

आज (शनिवारी) पंढरपुरात झालेल्या आंदोलनामध्ये बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यभरात कॉंग्रेस आंदोलनामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी होत असतानाच पंढरपुरात मात्र कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे या वेळी दिसून आले. 

केंद्र सरकारने नवीन कृषी विधयेक मंजूर केले आहे. या विधेयकाला कॉंग्रेसने गल्लीपासून दिल्लीपर्यंत विरोध सुरू केला आहे. आज इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कॉंग्रेसने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार पक्ष पातळीवरून तालुका आणि जिल्हास्तरावर भाजप सरकार विरोधात आंदोलन करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार आज पंढरपुरातही कॉंग्रेसने आंदोलन केले. 

दरम्यान, या आंदोलनामध्ये बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. पंढरपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. राजेश भादुले यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. एरव्ही मंत्री आणि नेत्यांच्या कार्यक्रमांना शेकडोंच्या संख्येने हजेरी लावणारे कार्यकर्ते पक्षाच्या आंदोलनाकडे मात्र पाठ का फिरवतात, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

मोदी सरकार विरोधात कॉंग्रेसचे सुप्रिमो राहुल गांधी एकाकी झुंज देत आहेत. कॉंग्रेसने भाजप विरोधी जनमत तयार करण्यासाठी आंदोलन पुकारलेले असतानाही कार्यकर्त्यांनीच आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने येथील आंदोलनाची चर्चा सुरू आहे. 

याबाबत कॉंग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष ऍड. राजेश भादुले म्हणाले, आज देशभरात आंदोलन आहे. सोलापूर येथे मोठे आंदोलन झाले. त्या आंदोलनाला प्रमुख पदाधिकारी गेले असावेत. पंढरपूरचे काही पदाधिकारी हे सांगोला येथे निरीक्षक म्हणून गेले आहेत. त्यातच कोरोनामुळे अधिक गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग ठेवून मोजक्‍याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज आंदोलन केले. कोणीही आंदोलनाकडे पाठ फिरवली नाही. आम्ही प्रसिद्धीसाठी नव्हे तर शेतकरी हितासाठी आंदोलन केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prominent bearers were not present in the Congress agitation at Pandharpur