
सोलापूर : लग्न हा स्त्री-पुरुषाच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा विषय. आयुष्यभर एकमेकांची साथ देण्यासाठी दोन जीव एकत्र येतात. परंतु, अशा दोन जीवांमध्ये लग्नानंतर किरकोळ कारणावरून खटके उडायला सुरवात होते अन् मग हा विषय समाजस्तरावर व नंतर पोलिस - न्यायालयात येतो. पोलिसांकडे पती-पत्नीच्या भांडणाचा विषय येतो. त्या वेळी पोलिसांकडून दोघांचेही समुपदेशन करून त्यांना विभक्त होण्यापासून परावृत्त करण्यात येते. सोलापूर शहर आयुक्तालयातील महिला सुरक्षा विशेष कक्षाने जानेवारी ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत 240 जणांचे तुटलेले संसार पुन्हा सांधण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांचे पुन्हा मनोमीलन झाले.
यातील 110 तक्रारदारांनी न्यायालयात त्यांची लढाई सुरू ठेवली असून, पोलिस ठाण्यांमध्ये 83 तक्रारदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयामध्ये महिला सुरक्षा विशेष कक्ष असून, या कक्षाकडून पती-पत्नीमधील वाद मिटवून त्यांच्यात सुसंवाद निर्माण करण्याचे काम करण्यात येते. पती-पत्नीमधील किरकोळ स्वरूपातील भांडणे, सासरच्या लोकांनी न नांदविणे, नवऱ्याकडून अनेक लग्नं करणे, पती-पत्नी सतत मोबाईलवर असणे अशा स्वरूपाच्या तक्रारी महिला सुरक्षा कक्षाकडे जास्त प्रमाणात येत असून, या तक्रारी करणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे.
कोरोना महामारीच्या लॉकडाउन कालावधीत अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणारे पती-पत्नी हे दिवसा अनेक तास एकत्रित राहिले. त्यामुळे किरकोळ कारणावरून अशा पती-पत्नींमध्ये तक्रारी होऊन त्यांच्यात वाद निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे काम नव्हते. पर्यायाने रोजीरोटी नव्हती. त्यामुळे सामान्य व गरीब नागरिकांच्या घरांमध्ये पती-पत्नींमध्ये वाद वाढल्याचे चित्र दिसून आले.
या तक्रारींमध्ये पती-पत्नी यांच्यामध्ये किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या. या तक्रारी आल्यानंतर महिला सुरक्षा विशेष कक्षातील अधिकारी व कर्मचारी हे त्यांचे म्हणणे ऐकून त्या दोघांमध्ये समुपदेशनाचे काम करतात. पती-पत्नीमध्ये योग्य प्रकारे समुपदेशन करून त्यांच्यामधील वाद मिटविला जातो व त्यांना पुन्हा एकत्रित संसार करण्यास प्रवृत्त केले जाते. ज्या पती-पत्नीमधील तक्रारी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असतील किंवा पती-पत्नी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील, तर त्यांना पोलिस ठाण्यात कायदेशीर कारवाईसाठी पाठविण्यात येते किंवा न्यायालयात पाठविण्यात येते. गेल्या दहा महिन्यांत महिला सुरक्षा विशेष कक्षाकडून 110 प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली असून, 83 प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यांमध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा आहेत तक्रारी
महिला सुरक्षा विशेष कक्षाकडून पती-पत्नींच्या तक्रारी ऐकून त्यावर तोडगा काढण्याचे काम करण्यात येते. तोडगा नाही निघाला तर त्यांना पुढील कायदेशीर मार्ग सांगितले जातात. महिलांवर कसल्याही प्रकारचा अत्याचार होत असेल, तर त्यांनी महिला सुरक्षा विशेष कक्षाशी संपर्क साधावा.
- शिरीष शिंदे,
पोलिस निरीक्षक, महिला सुरक्षा विशेष कक्ष, सोलापूर शहर
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.