esakal | ब्रेकिंग..! पंढरपूर आणि दहा किमी परिसरात 29 जून ते दोन जुलै संचारबंदीचा प्रस्ताव 
sakal

बोलून बातमी शोधा

Proposal for curfew in Pandharpur and 10 km area from June 29 to July 2

वारकऱ्यांनी घरी राहूनच प्रार्थना करावी 
यंदाची कोरोनाच्या महामारीची परिस्थिती लक्षात घेऊन वारकरी भाविकांनी घरी राहूनच श्री विठ्ठलाची प्रार्थना करावी आणि शासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले आहे. 

ब्रेकिंग..! पंढरपूर आणि दहा किमी परिसरात 29 जून ते दोन जुलै संचारबंदीचा प्रस्ताव 

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : यंदाची आषाढी यात्रा भरणा नाही. तथापि पंढरपूर परिसरात त्रिस्तरीय नाकाबंदी असलेला कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 29 जून ते दोन जुलै असे चार दिवस पंढरपूर शहर आणि परिसरातील दहा किलोमीटरच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पोलिस विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 
श्री. झेंडे म्हणाले, एक जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. कोरोना पार्श्वभूमीवर यंदा आषाढी यात्रा भरणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणीही वारकऱ्यांनी यावर्षी आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन करण्यात आलेले आहे. तथापि कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आदी भागातून दरवर्षीप्रमाणे भाविक येण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा बॉर्डरपासून त्रिस्तरीय पोलीस नाका-बंदी राहणार आहे. 
29 जून ते दोन जुलै असे चार दिवस पंढरपूर शहर आणि परिसरातील दहा किलोमीटरच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्यामुळे या चार दिवसात पंढरपूर तालुक्‍यातील देखील लोकांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. 
दरवर्षी 10 लाखाहून अधिक वारकरी पंढरपूरला येत असतात. त्यामुळे दरवर्षी पोलिसांना गर्दी नियंत्रित करावी लागत होती. यंदा मात्र पंढरपुरात कोणीही येऊ नये यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागणार आहेत. शासनाच्या पास व्यतिरिक्त पंढरपुरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. अशा प्रकारच्या बंदोबस्तासाठी सुमारे 1500 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे. 
जिल्हा बॉर्डर तसेच पंढरपूरपासून काही अंतरावर वाहनांची देखील तपासणी केली जाणार आहे. 25 मोटर सायकलवरून पोलिस सतत पेट्रोलिंग करणार आहेत. शासनाकडून नऊ संतांच्या पादुकांसह काही लोकांना पंढरपुरात येण्यास परवानगी देण्यात येणार आहे. शासनाच्या परवानगी शिवाय पंढरपुरात कोणालाही प्रवेश दिला जाणार आहे. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलिस निरीक्षक अरुण पवार, पोलिस निरीक्षक दयानंद गावडे उपस्थित होते.