आषाढी काळात अडीच दिवसांची संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. वारी काळात शहरात गर्दी होवूनये यासाठी 30 जून रोजी दुपारी दोन ते 2 जुलैच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहर व परिसरातील 10 किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करावी अशा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

पंढरपूर (सोलापूर) : करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. वारी काळात शहरात गर्दी होवूनये यासाठी 30 जून रोजी दुपारी दोन ते 2 जुलैच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहर व परिसरातील 10 किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करावी अशा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. 
दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शहरात 29 जून ते 2 जुलै अशी चार दिवसांची संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर वारकरी आणि पंढरपुरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत संचारबंदीचा कालावधी कमी करावा अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाने नव्याने अडीच दिवसांचा प्रस्ताव पाठवला आहे. नव्या प्रस्तावामध्ये 30 जूनच्या दुपारी 2 वाजले पासून ते 2 जुलैच्या सायंकाळी पाच वाजे पर्यंत शहर व परिसरातील 10 किलोमीटर परिसरात संचार बंदी लागू करण्यात यावी असा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सोमवार ऐवजी मंगळवार (ता. 30) पासून संचारबंदी लागू होण्याची शक्‍यता आहे. एक दिवसाने संचारबंदी कमी केल्याने पंढरपूर शहरातील नागरिक आणि व्यापार्यांमधून या निर्णयाचे स्वागत केले. 

38 भाविकांना पाठवले परत 
आषाढी यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला असला तरी राज्यभरातून अनेक भाविक पंढरीकडे येत असल्याचे दिसू लागले आहेत. भाविकांनी पंढरीत येवू नये असे पोलिस प्रशासनाने आवाहन केले असले तरी काही भाविक कळसाचे दर्शन घडावे या भावनेने पंढरीकडे येत आहेत. आज दिवसभरात पोलिसांनी चेक नाक्‍यावर तपासणी करताना जवळपास 38 भाविक आढळून आले आहेत. या भाविकांचे पोलिसांनी चांगल्या प्रकारे प्रबोधन करुन त्यांना परत पाठवण्यात पोलिसांनाही यश आले आहे. हे वारकरी चेकनाके चुकवून आड मार्गाने पंढरीत प्रवेश करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच अशा वारकऱ्यांना अडवून त्यांना परत पाठवले जात आहे. अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले वारकऱ्यांचे प्रबोधन उपयोगी पडू लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal to the District Collector to impose curfew for two and a half days during Ashadi period