अवैध धंद्यांना बसणार आळा! पोलिस आयुक्‍तांनी महासंचालकांना दिला 'असा' प्रस्ताव 

तात्या लांडगे
Wednesday, 26 August 2020

पाठपुराव्यातून होईल लवकरच निर्णय 
शहर आणि ग्रामीणची आस्थापना एक केल्यास कोणताही कर्मचारी त्याच-त्या ठिकाणी जास्त दिवस राहणार नाही. त्यामुळे काही अपप्रवृत्तींना आळा घालता येईल. गैरप्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्यांवर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सतत वॉच असतोच. तरीही आस्थापना एक केल्याचा मोठा फायदा होईल.
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त

सोलापूर : शहराची लोकसंख्या आणि विस्तार मर्यादित असल्याने शहरातील पोलिस ठाण्यांची संख्या सात एवढीच आहे. या पोलिस ठाण्यांचा बराच परिसरत एकमेकांशी संलग्नित आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांमधील वाढते संबंध शहरातील अवैध धंद्यांवरील कारवाईस अडचणी निर्माण होतात. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण आणि शहराची आस्थापना एकच करावी, असा प्रस्ताव पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी पोलिस महासंचालकांकडे पाठविला आहे.

 

शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या बदल्या करता याव्यात, जेणेकरून अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील कामात पारदर्शकता व सुसूत्रता येईल, असे त्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. दरवर्षी शहर-ग्रामीण पोलिस दलातील 15 टक्‍के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येतात. त्यामध्ये कार्यक्षेत्र एकच येत असल्याने अनेकदा काही अवैध धंद्याला पोलिस अधिकारी तथा कर्मचारी प्रोत्साहन देत असल्याचे निर्दशनास आले आहे. काही दिवसांपूर्वी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या गुन्ह्यात दोन पोलिस कर्मचारी, तर अवैध वाळू वाहतुकीस प्रोत्साहन दिल्याने एका पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी (ता. 24) जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नगरसेवक सुनिल कामाठी याच्या जुगार अड्ड्यासंदर्भात दोषी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. असे प्रकार ग्रामीणमध्येही सातत्याने सुरू असतात. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही आस्थापना एक केल्यास अशा प्रकाराला आळा बसेल, असा विश्‍वास व्यक्‍त करण्यात आला आहे.

 

पाठपुराव्यातून होईल लवकरच निर्णय 
शहर आणि ग्रामीणची आस्थापना एक केल्यास कोणताही कर्मचारी त्याच-त्या ठिकाणी जास्त दिवस राहणार नाही. त्यामुळे काही अपप्रवृत्तींना आळा घालता येईल. गैरप्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्यांवर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सतत वॉच असतोच. तरीही आस्थापना एक केल्याचा मोठा फायदा होईल.
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त

 

महासंचालकांच्या निर्णयानुसार कार्यवाही
शहर-ग्रामीण आस्थापना एक झाल्यास पोलिस कर्मचाऱ्यांमधील गैरप्रकार थांबण्यास मदत होईल. ग्रामीणमध्ये 25 पोलिस ठाण्याअंतर्गत सुमारे अडीच हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. दोन्ही आस्थापना एक करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांकडे पाठविला असून त्यांच्या निर्णयानुसार कार्यवाही होईल.
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक

 

पोलिस ठाण्यांची स्थिती
ग्रामीण पोलिस ठाणे
25
पोलिस कर्मचारी
2,500
शहरातील पोलिस ठाणे
7
पोलिस कर्मचारी
2,100

नगरसेवक कामाठीवर दाखल होणार खुनाचा गुन्हा
शहरातील अवैध धंदे संपविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह सात पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे वॉच ठेवला जात आहे. अवैध धंदेचालक आणि पोलिस अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे लागेबांधे पडताळणीचेही नियोजन केले आहे. तत्पूर्वी, अशोक चौक परिसरातील मटका बुकीच्या ठिकाणी धाड टाकताना इमारतीवरुन पडून परवेझ इनामदार (वय 42) याचा मृत्यू झाला. नगरसेवक सुनिल कामाठी याचा तो जुगार अड्डा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या कामाठी पसार झाला असून इनामदार याच्या मृत्यूप्रकरणी कामाठीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल होईल, अशी माहिती पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिली. कामाठीचा शहरात अवैध सावकारीचाही व्यवसाय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याअनुषंगानेही तपास सुरु करण्यात आला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The proposal given by the Commissioner of Police to the Director General will curb illegal trades