पंढरपूरमध्ये 25, 26 नोव्हेंबरला संचारबंदीचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव ! 22 ते 26 नोव्हेंबर एसटी वाहतूकही बंद? 

अभय जोशी 
Friday, 20 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने वारकरी येऊन संसर्ग वाढू नये, यासाठी दक्षता म्हणून 25 आणि 26 नोव्हेंबर असे दोन दिवस पंढरपूर शहर आणि लगतच्या आठ खेडेगावांमध्ये संचारबंदी लागू करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. याखेरीज 22 पासून 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूरकडे येणारी व जाणारी एसटी वाहतूकही बंद ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने वारकरी येऊन संसर्ग वाढू नये, यासाठी दक्षता म्हणून 25 आणि 26 नोव्हेंबर असे दोन दिवस पंढरपूर शहर आणि लगतच्या आठ खेडेगावांमध्ये संचारबंदी लागू करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. याखेरीज 22 पासून 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूरकडे येणारी व जाणारी एसटी वाहतूकही बंद ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. झेंडे म्हणाले, कोरोनामुळे आषाढी यात्रा होऊ शकली नाही, परंतु प्रतिकात्मकरीत्या वारी साजरी करण्यात आली. परिस्थिती लक्षात घेऊन कोणीही वारकऱ्यांनी यात्रेसाठी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन त्या वेळी करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कोरोनाचा धोका अजून संपला नसल्याने याही वेळी कोणीही वारकऱ्यांनी कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला येऊ नये. 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असल्याने 24 नोव्हेंबर रोजी रात्री 12 पासून 26 नोव्हेंबर रोजी रात्री बारा या काळात पंढरपूर शहर आणि लगतच्या आठ खेडेगावांमध्ये संचारबंदी लागू करावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय होईल. या काळात अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. वारकरी प्रतिनिधींच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांच्या मागण्यांच्या विषयी शासन स्तरावर लवकरच योग्य तोडगा काढला जाईल. 

चार दिवस पंढरपुरात सतराशे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. जिल्हा, तालुका आणि शहराच्या हद्दीवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम व अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal to impose curfew in Pandharpur on the occasion of Karthiki Ekadashi