esakal | "विजापूर रोड-होटगी रोड' पिकनिक स्पॉटचा प्रस्ताव करा, धर्मवीर संभाजी तलाव सुशोभिकरणाचा प्रारंभ 
sakal

बोलून बातमी शोधा

subhash deshmukh

"सकाळ'ला दिले धन्यवाद 
धर्मवीर संभाजी महाराज तलावाचे सुशोभिकरण व्हावे, यासाठी सकाळच्यावतीने सर्वात प्रथम आवाज उठविण्यात आला. तलावाचे सुशोभिकरण होत नाही तो पर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. या परिसरातील नागरिकांच्या बैठका, चर्चासत्र आयोजित केले. "सकाळ'च्यावतीने वृत्तमालिका, बैठका यासह इतर माध्यमातून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आमदार सुभाष देशमुख, या भागातील नगरसेवक यांनी दखल घेतली. या कामासाठी महापालिका प्रशासनाने व केंद्र शासनाने निधी उपलब्ध दिला. उपलब्ध झालेल्या निधीतून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तलावाच्या सुशोभिकरणाला सुरवात झाली आहे. "सकाळ'ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या भागातील महत्त्वाचा प्रश्‍न मार्गी लागल्याने उपस्थितांनी व प्रमुख पाहुण्यांनी "सकाळ'ला धन्यवाद दिले. 

"विजापूर रोड-होटगी रोड' पिकनिक स्पॉटचा प्रस्ताव करा, धर्मवीर संभाजी तलाव सुशोभिकरणाचा प्रारंभ 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर परिसरात सध्या एकही पिकनिक स्पॉट नाही, विरंगुळ्याचे व करमणुकीचे ठिकाण नसल्याने येथील पर्यटनाला चालना मिळत नाही. त्यातून रोजगार निर्मिती होत नाही. विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी महाराज तलाव, स्मृती वनविहार व होटगी रोडवरील तलाव या दरम्यान पिकनिक स्पॉट तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करा. केंद्र सरकारकडून पिकनिक स्पॉटसाठी आवश्‍यक ती मदत मिळवून देऊ, असा विश्वास माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी आज व्यक्त केला. 

धर्मवीर संभाजी महाराज तलाव सुशोभिकरणाच्या कामाचा प्रारंभ आज आमदार देशमुख यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली, उपमहापौर राजेश काळे, नगरसेविका मेनका राठोड, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, राजश्री बिराजदार, मनीषा हुच्चे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, माजी नगरसेवक बाबुराव घुगे, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार देशमुख म्हणाले, पिकनिक स्पॉटच्या माध्यमातून सोलापूरकरांना करमणुकीचे ठिकाण तर होईलच शिवाय त्यातून रोजगार निर्मिती होईल. पिकनिक स्पॉटच्या माध्यमातून पर्यटक, भाविक सोलापुरात येतील, येथील स्थानिक उद्योग व व्यवसायाला चालना मिळेल. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य अभियंता धनशेट्टी यांनी कामाबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. 

गणेश विसर्जनासाठी दोन कुंड 
धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसरात गणेश विसर्जनासाठी दोन कुंड तयार केले जाणार आहेत. याशिवाय दर दोन महिन्यांनी तलावातील पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. तलावाच्या बाजुच्या भिंतीचे मजबुतीकरण केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे सभागृहनेते श्रीनिवास करली यांनी दिली. 

सकाळचा पाठपुरावा 
दैनिक "सकाळ'च्यावतीने तलाव सुशोभिकरणासाठी मोहीम राबविण्यात आली. वार्तांकन व प्रत्यक्ष बैठकांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. सोलापुरातील समाजसेवी संस्थांनी साथ दिल्याने या भागातील ज्वलंत प्रश्‍न समोर आला. आमदार सुभाष देशमुख यांनी या प्रश्‍नी लक्ष घालून या भागातील नागरिकांची समस्या सोडविली असल्याची माहिती उपमहापौर राजेश काळे यांनी दिली.