कोरोना रुग्ण वाढू लागल्याने या गावात 27 जूनपर्यंत जनता कर्फ्यु 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जून 2020

सोलापूर ः पाकणी (ता. उत्तर सोलापूर) या गावामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्या गावातील ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी 27 जूनपर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून (ता. 23) हा जनता कर्फ्यु लागू केला आहे.

सोलापूर ः पाकणी (ता. उत्तर सोलापूर) या गावामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्या गावातील ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी 27 जूनपर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून (ता. 23) हा जनता कर्फ्यु लागू केला आहे. 

पाच दिवस सहकारी, वैद्यकीय सेवा वगळता गावातील सर्व प्रकारचे व्यवहार व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावात शुकशुकाट दिसत आहे. पाकणी गावातील वाणी गल्ली परिसरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्यानंतर सरपंच शोभा गुंड, सुनिल गुंड, ग्रामपंचायत सदस्य शरद चंदनशिवे, बापू ढेपे, बटू शिंदे, किशोर गुंड, बाळू बेलभंडारे, संदीप चटके, पोलीस पाटील प्रकाश पाटील व गावातील युवकांनी पुढाकार घेत ग्रामसेवक गंगाधर कांबळे यांच्याकडे जनता कर्फ्यू घोषित करण्यासाठी साकडे घातले होते. गावांमध्ये कोरोनासंदर्भात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे गावातील नागरिक विविध कारणे सांगत असल्याने ग्रामस्थांकडून भीती व्यक्त करण्यात येत होती. बाहेरून येणाऱ्या लोकांच्या वर्दळीमुळे करोचा प्रसार रोखणे अशक्‍य झाले होते. त्यामुळे दिवसभर या ना त्या कारणाने बाहेरून येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक युवकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे दक्षता घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार, ग्रामसेवक कांबळे व सरपंच गुंड यांनी ग्रामस्थांच्या समन्वय बैठकीत पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. यावेळी सर्वच व्यावसायिक आणि उपस्थित ग्रामस्थांनी देखील त्यांच्या या प्रस्तावाला सहमती दर्शिवली. सकाळी आठ वाजेपर्यंत दूध संकलन केंद्रांवर असणारी वर्दळ वगळता अन्यत्र शांतता दिसत आहे. 

वाणी गल्ली येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तेथील नागरिकांनी संपूर्ण गल्ली लॉक केली आहेत. तसेच कोरोना रुग्णाचे नातेवाईकांना केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. लोकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून सरकारी आरोग्य केंद्रास सर्व प्रकारच्या औषध गोळ्यांचा पुरवठा केला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये दिवसभर ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक तळ ठोकून आहेत. गावातील सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी व आशा सेविका लोकांची आरोग्य तपासणी करत आहेत. तसेच गावात येणाऱ्या प्रत्येकाची कटाक्षाने नोंद घेत आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A public curfew has been imposed in this village till June 27 as corona patients are on the rise