जनता कर्फ्यू : नातेपुते चार किंवा सात दिवस बंद राहणार हे निश्‍चित ! 

सुनील राऊत 
Friday, 11 September 2020

नातेपुते शहरात 17 जुलै रोजी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर ऑगस्टअखेर 40 रुग्ण झाले व 1 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर या काळात आणखी 46 रुग्णांची यात भर पडली आहे. एकूण संख्या 86 झालेली आहे. हा वाढता आलेख रोखण्यासाठी नातेपुते बाजारपेठेत जनता कर्फ्यू लागू करावा, असे एकमताने ठरले आहे. 

नातेपुते (सोलापूर) : नातेपुते शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे लक्षात घेऊन नातेपुते ग्रामपंचायतीने गुरुवारी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. नातेपुते ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच ऍड. भानुदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची विशेष बैठक झाली. 

या बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज खाडे, विजय उराडे, ग्रामपंचायत सदस्य अजय भांड, इम्रान बागवान, भारत सोरटे, सचिन भोजने, आरोग्य परिचारिका एखंडे, आरोग्यसेवक विशाल काशीद, पोलिस कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी विक्रम मोरे व व्यापारी उपस्थित होते. 

नातेपुते शहरात 17 जुलै रोजी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर ऑगस्टअखेर 40 रुग्ण झाले व 1 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर या काळात आणखी 46 रुग्णांची यात भर पडली आहे. एकूण संख्या 86 झालेली आहे. हा वाढता आलेख रोखण्यासाठी नातेपुते बाजारपेठेत जनता कर्फ्यू लागू करावा, असे एकमताने ठरले आहे. 
सध्या पाऊस झालेला आहे हे पाहता शेतकऱ्यांना बी - बियाणे व खतांसाठी दुकाने सकाळी दहापर्यंत दररोज उघडी ठेवावीत तसेच दूध आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्व बाजारपेठ 100 टक्के बंद असावी, असे एकमताने ठरले आहे. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांनी आवाहन केले आहे, की या बंद काळात सर्व व्यापाऱ्यांनी व भाजीपाला विक्रेत्यांनी ग्रामीण रुग्णालयात रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घ्यावी. 

बैठकीत 12 ते 18 सप्टेंबर असा बंदीचा कालावधी ठरला आहे. परंतु नंतर 13 ते 16 सप्टेंबर बंद असावा, असा काहींनी आग्रह धरला आहे. मात्र, अंतिम निर्णय कोणीही सांगण्यास तयार नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A public curfew was imposed in and around Natepute as the number of corona patients was increasing