
विक्रम ढोणे म्हणाले...
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासंदर्भात राज्य शासनाकडून दिरंगाई केली जात आहे. त्या निषेधार्थ सोमवारपासून (ता. 25) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाणार असून या आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही आपण आंदोलनावर ठाम असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी पत्रकाद्वारे दिली.
विक्रम ढोणे म्हणाले...
सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींचे स्मारक हे शासकीय निधीतून व्हावे, अशी आमची मागणी आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मारकाचे भूमीपूजन होईल, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप त्यानुसार काहीच झाले नाही. ना भूमिपूजन, ना निधी मिळाला. सरकारचे प्रतिनिधी खोट्या घोषणा करून मोकळे झाले आहेत. शासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शासनाला जागे करण्याच्या हेतूने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करणार असल्याचेही ढोणे म्हणाले. अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी तरतूद केल्याचे लेखी आदेश काढावेत, भूमीपूजनाची तारीख निश्चित करावी, त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही शांततेच्या मार्गाने, सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.