औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्याचा प्रश्‍न ! माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, नो कॉमेंट 

तात्या लांडगे 
Tuesday, 5 January 2021

औरंगाबाद व नगरचे नामांतर करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनी आपण यासंदर्भात काहीच बोलणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही मौन बाळगले आहे. दरम्यान, नामकरणावरून विरोधक महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला जात आहे. 

सोलापूर : औरंगाबादचे नामकरण करून त्यास संभाजीनगर नाव देण्याचा विषय चिघळला आहे. विरोधकांनी कॉंग्रेस व शिवसेनेला टार्गेट करीत आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. यासंदर्भात कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र बोलण्यास नकार देत "नो कॉमेंट' म्हणून या विषयावरून हात झटकले. 

औरंगाबाद व नगरचे नामांतर करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनी आपण यासंदर्भात काहीच बोलणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही मौन बाळगले आहे. दरम्यान, नामकरणावरून विरोधक महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसची वरिष्ठ नेतेमंडळी आमदारांची बैठक घेणार असल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर नामकरणावर महाविकास आघाडी स्पष्ट भूमिका घेईल, असेही राजकीय विश्‍लेषक सांगू लागले आहेत. 

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे "महाविकास'ची सावध भूमिका 
आता राज्यातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना नेत्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली नाही, असे दिसून येत आहे. राज्यात सत्तेत असलेले तीन पक्ष ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढवत आहेत. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद व नगर जिल्ह्याच्या नामकरणाच्या प्रश्‍नावर महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. या उलट भाजपचे नेते आक्रमकपणे महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोंडीत पकडून टीका करण्याचा सपाटा सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the question of renaming Aurangabad former Union Minister Sushilkumar Shinde said no comment