सोलापुरात रेबिजचे प्रमाण शून्यावर;  48 हजारांहून अधिक मोकाट कुत्री 

तात्या लांडगे 
Sunday, 27 September 2020

पशुवैद्यकीय अधिकारीडॉ. शुभांगी ताजणे यांनी सांगितले की, शहरातील कुत्र्यांची संख्या कमी व्हावी म्हणून मागील वर्षी चार हजार 717 कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्यात आले. तर आगामी काळात बंगळुरु येथील "अँट्री' या एनजीओमार्फत मोफत रेबिज समूळ नष्टता कार्यक्रम राबविला जाणार आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी. 

 जागतिक रेबीज दिन विशेष 

 सोलापूर : जागतिक फॉर्म्यूल्यानुसार 32 व्यक्‍तींमागे एक कुत्रा असा अंदाज लावला जातो. मात्र, सोलापूर शहरात हा अंदाज चुकीचा ठरला असून 27 व्यक्‍तींमागे एक कुत्रा असल्याची स्थिती दिसून येते. शहरात सद्यस्थितीत शहरात 48 हजारांहून अधिक मोकाट कुत्री असून त्यांची विविध नगरांसह पेठांमध्ये दहशत वाढली आहे. दुसरीकडे शहरातील रस्त्यांवरही त्यांचे वास्तव्य वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढू लागले आहे. 

शहरातील कुत्र्यांची संख्या वाढलेली असतानाही निर्बिजिकरणाची मोहीम राबविण्याची गरज आहे. मागील वर्षी निर्बिजिकरणासाठी 40 लाखांचा निधी महापालिकेने उपलब्ध करुन दिला होता. त्यातून चार हजार 717 मोकाट कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्यात आले. यंदा 20 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून निवीदा प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. मात्र, यापूर्वी निर्बिजिकरण केलेल्या मक्‍तेदाराला महापालिकेकडून दमडाही मिळालेला नाही. शहरातून रेबीज हा आजार हद्दपार झाल्याने महापालिकेने मोकाट कुत्र्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागातर्फे दर पाच वर्षांतून एकदा सर्वच जनावरांचा सर्व्हे केला जातो. मात्र, मागील पाच वर्षांत सर्व्हे न झाल्याने शहरातील मोकाट कुत्र्यांचा अंदाज महापालिकेस आलेला नाही. रेबिजचे प्रमाण शून्य टक्‍क्‍यांवर आले, परंतु महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये रेबिजची लसच उपलब्ध नसल्याचेही आरोग्य विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पशुवैद्यकीय अधिकारीडॉ. शुभांगी ताजणे यांनी सांगितले की, शहरातील कुत्र्यांची संख्या कमी व्हावी म्हणून मागील वर्षी चार हजार 717 कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्यात आले. तर आगामी काळात बंगळुरु येथील "अँट्री' या एनजीओमार्फत मोफत रेबिज समूळ नष्टता कार्यक्रम राबविला जाणार आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी. 

शहरातील मोकाट कुत्र्यांची स्थिती 

  • शहरातील अंदाजित कुत्री - 48,400 
  • कुत्र्यांचा प्रजनन काळ - 58 ते 63 दिवस 
  • एकावेळी पिल्लांना जन्म - 5 ते 6 
  • निर्बिजिकरणासाठी निधी - 20 लाख 
  • एका कुत्र्यामागील निर्बिजिकरण खर्च - 760 रुपये 
  • पाच वर्षांतील रेबिजचे प्रमाण - शून्य टक्के 

संपादन : अरविंद मोटे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabies in Solapur at zero; More than 48,000 dogs