ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईलऐवजी हवा टीव्ही; यांनी केली मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

शासनाने जबाबदारी झटकू नये 
शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि स्थानिक प्रशासनाने घ्यावी. शाळा व्यवस्थापन याबाबत कोणताही निर्णय घेण्यास समर्थ नाही. 
सातलिंग शटगार, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना 

सोलापूर ः सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. त्यामुळे शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला आहे. मात्र, या शिक्षणासाठी सर्रास मोबाईलचा वापर केला जात आहे. मात्र, मोबाईल वापरणे शालेय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईलऐवजी टीव्ही किंवा रेडिओची सोय करण्याची मागणी जिल्हा शिक्षक भारती संघटनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांना दिले आहे. 

ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची साधने उपलब्ध करून द्यावीत, विनाअनुदानित शाळांना विनाअट 100 टक्के अनुदान द्यावे, कोविड ड्युटीवर मरण पावलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांना मदत द्यावी, कोविड ड्युटीवर कोरोनोची लागण झाल्यामुळे उपचाराचा खर्च तातडीने मिळावा, ड्युटी करणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतरांना कार्यमुक्त करून त्यांचा वापर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी करावा, ड्युटी केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद करणे, प्रोत्साहन भत्ता देऊन विशेष वेतनवाढ लागू करावी, शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे सॅनिटायझेशन करावे; शाळांना थर्मल स्कॅनिंग मशिन, सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज हे साहित्य खरेदीसाठी विशेष आनुदान द्यावे, विद्यार्थ्यांना वर्कबुक व ऍक्‍टिव्हिटी बुक द्यावे, कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्या गरीब व भटक्‍या विद्यार्थ्यांना त्यांचा घराजवळील शाळेत विनाअट प्रवेश द्यावा, अनुदान, पगार, महागाई भत्ते यामध्ये कपात करू नये, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतांना शाळेतील उपस्थिती शाळा सुरू होईपर्यंत बंधनकारक करू नये, अशा मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, अक्कलकोट तालुकाध्यक्ष दिलीप बिराजदार, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष रविकांत विभुते, सुदर्शन वऱ्हाडे, संजय गडदे, वैभव शेटे, नितीन कुलकर्णी, अंबादास गवळी उपस्थित होते. 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radio, TV instead of mobile for online education; Demanded by