मंगळवेढा तालुक्‍यात अवैध मद्य विक्रीवर चार ठिकाणी छापा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

88 हजारांचा मुद्देमाल हस्तगत 
जिल्हाधिकारी यांच्या मद्यबंदीच्या आदेशाला डावलून मंगळवेढा तालुक्‍यात मोठ्याप्रमाणावर अवैध मद्य विक्री होत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कारवाईची मोहिम होती घेतली असून आज तालुक्‍यात चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 88 हजार 704 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पोलिसांनी अवैध मद्य विक्री करणाऱ्या चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तीन दुचाकींसह 88 हजार 704 रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून या प्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 
रावसाहेब सिदा दोलतडे (वय 48) हा नंदेश्‍वर येथील चिंचेच्या झाडाखाली बेकायदेशीररीत्या मद्य विक्री करत असताना सापडला असून त्याच्याकडील 18 दारूच्या बाटल्या (किंमत 936 रुपये) हस्तगत केल्या. या प्रकरणी फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल राजू आवटे यांनी दिली. दुसऱ्या घटनेत निंबोणी ते सलगर रोडवरील निंबोणी शिवारातील मरिआई चौकाच्या बाजूला तुषार अरुण पाटील (वय 24) व श्रीकांत बबन रोंगे (वय 26) हे दोघे (रा. कचरेवाडी) दुचाकीवरून दारू घेऊन चालले होते. त्यांच्याकडील 24 बिअरच्या बाटल्या (किंमत दोन हजार 352 रुपये), दुचाकी 25 हजारांची असा 27 हजार 352 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल मळसिद्ध कोळी यांनी दिली आहे. त्याच परिसरामध्ये सुहास हिप्परकर (वय 23, नवीन पोलिस लाइन पंढरपूर), विठ्ठल साळुंखे (वय 30, रा. माडग्याळ, ता. जत, जि. सांगली) यांच्या ताब्यातून नऊ हजार 504 रुपयांच्या दारूच्या 24 बाटल्यांसह दुचाकी (एमएच 13 डीके 7250, किंमत 34 हजार 504) ताब्यात घेतली. याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल पैगंबर नदाफ यांनी दिली. तर महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील कात्राळ चेक पोस्टवर मारुती बंडू नरुटे (वय 22, रा. तळसंगी), सोमनाथ हबगुंडे, म्हाळाप्पा हबगुंडे (दोघे रा. शिरढोण, ता. चडचण) यांच्याकडून 25 हजार 912 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल भीमाशंकर तोरणे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on illegal sale of liquor in four places in Mangalwedha taluka