आता एसटी बसचेही कळणार लोकेशन ! सोलापूर जिल्ह्यातील 654 बसना व्हीटीएस सिस्टीम 

विजय थोरात 
Saturday, 16 January 2021

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरिता व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम एमएसआरटीसी कॉम्प्युटर हे नवीन ऍप तयार केले असून, रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणे एसटी महामंडळ प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देत आहे.

सोलापूर : एसटी बसने एखाद्या गावी जात असताना आपण नेमकं कुठे आहोत, किती वेगाने बस धावतेय, आता कुठल्या गावी आहोत व पुढील गाव कुठले आहे, कधी पोचू हे कळत नव्हतं. त्यामुळे एसटी बसने प्रवास म्हणजे कंटाळवाणे व त्रासदायक ठरते. मात्र आता राज्य परिवहन महामंडळाने सोलापूर जिल्ह्यातील बसना व्हीटीएस प्रणाली बसविली असून, मोबाईल ऍपद्वारे आपल्याला एसटी बसचे लोकेशन कळणे सोपे जाणार आहे तसेच प्रवासही सुखकारक ठरणार आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर जिल्ह्यातील नऊ आगारातील 654 एसटी बसना व्हीटीएस प्रणाली बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच प्रवाशांना बसचे लोकेशन ऍपच्या माध्यमातून कळणार असल्याची माहिती सोलापूर आगाराचे व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी यांनी "सकाळ'ला दिली. एसटी कुठे आहे, किती वेळात कुठे येईल ही सर्व माहिती एका क्‍लिकवर प्रवाशांना आता मिळणार आहे. यासंबंधीची यंत्रणा महामंडळाने विकसित केली आहे. काही दिवसांतच एसटी महामंडळ बसचे लोकेशन ऍपवर ट्रॅक करता येणार असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात एकूण नऊ आगार आहेत. नऊ आगार मिळून जिल्ह्यात 654 एसटी बस आहेत. या सर्व बसमध्ये व्हीटीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. 

ऍपवर कोणती माहिती मिळेल? 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरिता व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम एमएसआरटीसी कॉम्प्युटर हे नवीन ऍप तयार केले असून, रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणे एसटी महामंडळ प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देत आहे. हे जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम या यंत्रणेमुळे शक्‍य होणार आहे. प्रवाशांना जवळची बसस्थानके, त्या ठिकाणी येणाऱ्या - जाणाऱ्या बस, बस कुठे जात आहे, सध्या ती कुठे आहे, बस किती वेगाने धावत आहे, बस किती वेळापासून थांबून आहे, बसचा पुढील स्टॉप कोणता आहे, बस क्रमांक काय आहे, बसचा मार्ग कोणता आहे हे देखील प्रवाशांना आता पाहता येणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील नऊ आगारातील महामंडळाच्या 654 गाड्यांमध्ये व्हीटीएस प्रणाली बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना गाड्यांची संपूर्ण माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे. एसटीने प्रवास करणे आता प्रवाशांना सोपे झाले आहे. 
- दत्तात्रय कुलकर्णी, 
आगार व्यवस्थापक, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Like railways ST buses also will now know the location