अक्कलकोट तालुक्‍यात रोहिणी नक्षत्राच्या धारा बरसल्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

अचानक दुपारी बारानंतर सर्वत्र आभाळ भरून आले आणि एक मध्यम स्वरूपाचा चांगला पाऊस झाला. त्याने मागील 10-15 दिवसांपासून प्रचंड उन्हाच्या झळाने आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍याचा मुख्य हंगाम हा खरीपच आहे. त्याला पूरक असा आजचा रोहिणी नक्षत्राचा पाऊस झाला. अनेक गावांत ढगांच्या गडगडाटासह 25 मिनिटे ते अर्धा तास चांगला पाऊस झाला आहे. 

हेही वाचा : सोलापूर महापालिका उभारणार विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा

खरीप पेरणी मशागतीला प्रारंभ 
शेतकरी बंधूंना खरीप पेरणी मशागत, काही उभ्या पिकांना एक पाणी देणे तसेच कांदा व मिरची रोपे तयार करणे आदी गोष्टी करण्यासाठी पाऊस लाभदायी ठरला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यात अचानक दुपारी बारानंतर सर्वत्र आभाळ भरून आले आणि एक मध्यम स्वरूपाचा चांगला पाऊस झाला. त्याने मागील 10-15 दिवसांपासून प्रचंड उन्हाच्या झळाने आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. 

हेही वाचा : उर्जा क्षेत्राचे होणार खासगीकरण 

यापरिसरात झाला पाऊस 
अक्कलकोट शहरात मात्र पाऊस झाला नाही. मात्र, ग्रामीण भागातील जेऊर, तडवळ, केगाव, नावदगी, गौडगाव, दुधनी, कुरनूर, करजगी, घुंगरेगाव, शेगाव, चुंगी व कल्लहिप्परगी आदींसह अनेक भागांत पाऊस झाला आहे. हा पाऊस खरिपाच्या मशागतीसाठी पोषक आहे. तसेच ऊस, फळबागा व चारा पिके यासाठी उपयुक्त आहे. 

मोहोळ तालुक्‍यातही पाऊस 
जिल्ह्यातील मोहोळ तालुक्‍यातही दुपारी रोहिणीच्या पावसाला सुरवात झाली. तालुक्‍यातील अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने काही प्रमाणात वातावरणात गारवा निर्माण झाला होता. कुरूल, कामती परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून अन्य ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची तयारी केली आहे. सकाळपासून तालुक्‍यात ढगाळवातावरण होते. त्यामुळे उकाडा जाणवत होता. या उकाड्यापासून नागरिकांना सुटका मिळली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Akkalkot taluka