"साखरेला 3500 रुपये भाव मिळाला तरच टिकतील कारखाने; अन्यथा मुंबई-सोलापूरच्या सूत गिरण्यांसारखी अवस्था !' 

प्रदीप बोरावके 
Thursday, 7 January 2021

क्विंटलमागे 450 रुपयांचा तोटा कारखान्यांना होत आहे. साखरेचा उत्पादन खर्च व त्याला मिळणारा भाव याचा ताळमेळ लागत नाही, हे त्यामागील प्रमुख कारण आहे. परिणामी गेल्या सात ते आठ वर्षांपासून राज्यातील अनेक कारखाने 50 ते 60 कोटी रुपयांनी तोट्यात गेले आहेत. काही कारखान्यांचा तोटा 100 कोटींपर्यंत गेला आहे. 

माळीनगर (सोलापूर) : साखरेचा उत्पादन खर्च व साखरेला मिळणारा दर यामध्ये मोठी तफावत असल्याने राज्यातील साखर कारखान्यांना क्विंटलमागे 450 रुपयांचा तोटा सध्या होत आहे. परिणामी कारखान्यांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारखान्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी व राज्यातील साखर उद्योग टिकण्यासाठी केंद्र सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) 3500 रुपये करायला हवी, अशी मागणी दि सासवड माळी शुगर फॅक्‍टरीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे यांनी केली आहे. 

पत्रकार दिनानिमित्त माळीनगर साखर कारखान्यातर्फे माळशिरस तालुक्‍यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी कारखान्याचे पूर्णवेळ संचालक सतीश गिरमे, माजी व्यवस्थापकीय संचालक विजयकांत कुदळे, अरविंद जाधव उपस्थित होते. 

इथेनॉलमुळे भरून येईल थोडाफार तोटा 
राजेंद्र गिरमे म्हणाले, एक क्विंटल साखरेचा उत्पादन खर्च 3500 ते 3600 रुपये आहे. केंद्राने निश्‍चित केलेली साखरेची एमएसपी 3100 रुपये आहे. मात्र, प्रत्यक्षात साखरेला 3100 रुपये दर कधीच मिळत नाही. त्यामुळे आर्थिक गरजा भागविण्यासाठी कारखान्यांना त्यापेक्षा कमी दराने म्हणजे 3020 ते 3050 रुपये दराने नाइलाजाने साखर विकावी लागते. त्यामुळे क्विंटलमागे 450 रुपयांचा तोटा कारखान्यांना होत आहे. साखरेचा उत्पादन खर्च व त्याला मिळणारा भाव याचा ताळमेळ लागत नाही, हे त्यामागील प्रमुख कारण आहे. परिणामी गेल्या सात ते आठ वर्षांपासून राज्यातील अनेक कारखाने 50 ते 60 कोटी रुपयांनी तोट्यात गेले आहेत. काही कारखान्यांचा तोटा 100 कोटींपर्यंत गेला आहे. यंदा इथेनॉलमुळे त्यातील थोडाफार तोटा भरून येईल. 

साखर कारखाने चालविणारे राज्यातील कोणतेही मंत्री, खासदार, आमदार हे साखर कारखान्यांचे दुःख, समस्या व्यक्त करीत नाहीत. या गंभीर विषयावर कोणीही बोलायला तयार नाही, अशी खंतही श्री. गिरमे यांनी या वेळी बोलून दाखवली. केंद्र सरकारने मध्यंतरी साखरेची एमएसपी 3300 रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, साखरेला 3500 रुपये भाव मिळायला हवा, तरच साखर कारखाने टिकतील; अन्यथा मुंबई, सोलापुरातील सूत गिरण्यांसारखी राज्यातील साखर उद्योगाची अवस्था होईल. त्यामुळे या क्षेत्रातील जाणकारांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून साखरेची एमएसपी व उसाची एफआरपी यातील दरी दूर करायला हवी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajendra Girme expressed fears that the sugar factories would close down if they did not get the right price for sugar