राज्य सरकार दुजाभाव करतेय ! खासगी साखर कारखान्यांनाही द्यावी थकहमी : राजेंद्र गिरमे 

Saswad Mali
Saswad Mali
Updated on

माळीनगर (सोलापूर) : साखर कारखान्यांना मदत करताना राज्य सरकार खासगी व सहकारी असा दुजाभाव करीत आहे. सहकारी कारखान्यांप्रमाणेच खासगी साखर कारखान्यांनाही राज्य सरकारने थकहमी द्यायला हवी, अशी मागणी दि सासवड माळी शुगर फॅक्‍टरीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे यांनी केली. 

कारखान्याच्या 87 व्या गाळप हंगामाचे बॉयलर पूजन कारखान्याचे पूर्णवेळ संचालक सतीश गिरमे यांच्या हस्ते आज (शनिवारी) झाले. त्या वेळी श्री. गिरमे बोलत होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष नंदकुमार गिरमे, उपाध्यक्ष राहुल गिरमे, संचालक विलास इनामके, परेश राऊत, मोहन लांडे, विशाल जाधव, निळकंठ भोंगळे उपस्थित होते. 

यंदा कारखाना सहा लाख टन उसाचे गाळप करणार असून, त्यासाठीची सर्व यंत्रणा तयार असल्याचे स्पष्ट करून श्री. गिरमे म्हणाले, आठ-नऊ महिन्यांपासून केंद्राकडे कारखान्याचे 10 कोटी रुपये साखर निर्यात अनुदान अडकले आहे. ते द्यायला केंद्र सरकार तयार नाही. केंद्र सरकार साखर विक्री करू देत नाही. दर महिन्याला साखर विक्रीचा कोटा ठरवून देते. व्यापारी साखर उचलत नाहीत. त्यामुळे कारखान्यांना कमी दराने साखर विक्री करावी लागते. साखर शिल्लक राहिल्याने पोत्यामागे 300 ते 350 रुपये व्याज कारखान्यांना भरावा लागते. त्याचा आर्थिक भुर्दंड कारखान्यांना सोसावा लागतो. केंद्राने 3300 रुपये क्विंटल साखरेची आधारभूत किंमत जाहीर करून दोन महिने झाले तरीही त्याचे नोटिफिकेशन अजून निघाले नाही. साखरेचे दर 3500 ते 3600 रुपये झाल्याशिवाय साखर उद्योगाला ऊर्जितावस्था येऊ शकत नाही, याचा केंद्राने विचार करायला हवा. केंद्र सरकार एकीकडे इथेनॉल उत्पादन वाढवायला सांगते; मात्र दुसरीकडे त्यासाठी अनेक जाचक अटी घातल्या आहेत. त्या कमी करायला हव्यात. 

राज्य सरकारकडे अनेक जुनी अनुदाने थकली आहेत. 10 वर्षांपूर्वीचे साखर उतारा घट अनुदान राज्य सरकारने खासगी कारखान्यांना अजून दिले नाही; ते तातडीने मिळायला हवे. राज्यातील कोणताही कारखाना एकरकमी एफआरपी देऊ शकत नाही. शेतकऱ्यांचीही तशी अपेक्षा नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने 25 बेडचे हॉस्पिटल उभारले आहे. त्यासाठी पाच व्हेंटिलेटर व 10 ऑक्‍सिजन सिलिंडरची व्यवस्था करून तज्ज्ञ डॉक्‍टरांची नेमणूक केली आहे, असे श्री. गिरमे यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील साखर कारखाने म्हणजे मंदिरे आहेत. केंद्र व राज्य सरकारने ही मंदिरे जपायला हवीत. 
- नंदकुमार गिरमे, अध्यक्ष, माळीनगर कारखाना 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com