पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी राजेश्री भोसले बिनविरोध 

भारत नागणे 
Wednesday, 3 March 2021

पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी राजेश्री पंडितराव भोसले यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. प्रशांत देशमुख यांनी आपल्या उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त जागेसाठी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती सदस्यांची विशेष सभा पार पडली. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी राजेश्री पंडितराव भोसले यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. प्रशांत देशमुख यांनी आपल्या उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त जागेसाठी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती सदस्यांची विशेष सभा पार पडली. यामध्ये उपसभापतिपदी राजेश्री पंडितराव भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

राजेश्री भोसले या सरकोली गणातून निवडून आल्या आहेत. उच्चशिक्षित असलेल्या राजेश्री भोसले यांनी यापूर्वी "विठ्ठल'चे संचालक व बाजार समितीच्या उपसभापती म्हणून उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली आहे. भोसले यांनी 2016 मध्ये आमदार प्रशांत परिचारक गटाकडून सरकोली पंचायत समितीची गणातून निवडणूक लढवली होती. 

सुरवातीला तीन वर्षे अरुण घोलप यांनी उपसभापती म्हणून काम केले. त्यानंतर कासेगाव येथील प्रशांत देशमुख यांना एक वर्षासाठी संधी मिळाली होती. त्यानंतर आता उर्वरित एक वर्षासाठी राजेश्री भोसले यांना उपसभापतिपदाची संधी देण्यात आली आहे. 

उपसभापतिपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व सदस्य व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षे पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आमदार प्रशांत परिचारक व ज्येष्ठ नेते मंडळींनी विश्वास दाखवून माझी उपसभापती म्हणून निवड केली आहे. त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणार आहे, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि पाणी हे मूलभूत प्रश्न सोडवण्याच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचेही राजेश्री भोसले यांनी सांगितले. 

या वेळी सभापती अर्चना व्हरगर, माजी सभापती दिनकर नाईकनवरे, राजेंद्र पाटील, माजी उपसभापती अरुण पाटील, प्रशांत देशमुख, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष घोडके, प्रणव परिचारक, सदस्य संभाजी शिंदे, पल्लवी यलमर, अर्चना पाटोळे, धोंडिराम मोटे, सत्यवान देवकुळे, उमा बंगाळे आदी उपस्थित होते. 

निवडीनंतर तहसीलदार बेल्हेकर यांच्या हस्ते नूतन उपसभापती भोसले यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी निवडणूक सहाय्यक अधिकारी संतोष मोरे यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajeshri Bhosale was elected as the Deputy Chairman of Pandharpur Panchayat Samiti