राजेवाडी तलाव सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला

rajewadi talaw
rajewadi talaw

महूद (सोलापूर) : सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील माणदेशी दुष्काळी पट्ट्याला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून सुमारे 140 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला राजेवाडी तलाव शुक्रवारी (ता.11) पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील लाभधारक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे. 

ब्रिटिश राणी व्हिक्‍टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 140 वर्षापूर्वी माणगंगा नदीवर सांगली जिल्ह्यातील राजेवाडी (ता.आटपाडी) येथे या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या तलावाची भिंत व दारे राजेवाडी (जि.सांगली) हद्दीत आहे. तर पाणी साठा माण (जि.सातारा) हद्दीत होतो आहे. वरचेवर पाऊस कमी होत असल्याने हा तलाव पाण्याअभावी सन 2019 पर्यंत सलग दहा वर्षे कोरडा ठणठणीत होता. दहा वर्षांनंतर गेल्या वर्षी ऑक्‍टोबर 2019 मध्ये प्रथम हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता.

नेहमी परतीच्या पावसाने भरणारा हा राजेवाडी तलाव यावर्षी लवकर भरला आहे. या तलावाच्या पाण्यावरती सोलापूर व सांगली जिल्ह्यातील काही गावांमधील शेती अवलंबून आहे. गतवर्षी हा पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रातील गावांना त्याचा चांगला फायदा झाला होता. यावर्षी ही तो पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
 
राजेवाडी तलावाच्या लाभक्षेत्रातील हा माणदेशी पट्टा केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून होता. या पट्ट्यात केवळ पावसाच्या पाण्यावर एकच पीक घेता येत होते. मात्र तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात पिके आता शेतकऱ्यांना घेता येणार आहेत. शिवाय खात्रीशीर पाण्याची व्यवस्था झाल्याने या भागातील शेतकरी ऊस, केळी अशा नगदी पिकांकडे ही वळले असून शेकडो एकर पडीक जमीन लागवडीखाली येत आहे. 

राजेवाडी तलावाचा सांडवा एक किलोमीटर हून अधिक लांबीचा आहे. त्यावरून वाहणारे पाणी अगदी समुद्रकिनाऱ्याचा अनुभव देत आहे. त्यामुळे हा तलाव पर्यटकांसाठी खास आकर्षणही ठरला आहे. गतवर्षी या परिसरातील हजारो पर्यटकांनी या तलावाला भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटला होता. तलाव भरल्याने माण नदी प्रवाहित झाली आहे. नदी प्रवाहीत झाल्याने त्याचा फायदा सांगोला तालुक्‍यातील खवासपूर ते मेथवडे व पुढे पंढरपूर तालुक्‍यातील नदीकाठच्या गावांना होणार आहे. 

लक्ष्मीनगरचे शेतकरी विश्वजीत नरळे म्हणाले, सलग दुसऱ्या वर्षी राजेवाडी तलाव भरल्याने लाभक्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी अशी तीन खात्रीशीर पिके घेता येतील. हा पट्टा उन्हाळी भुईमुगासाठी प्रसिद्ध असून पुन्हा हा भाग भुईमुगाचे आगार होईल.

राजेवाडी प्रकल्पचे शाखा अभियंता अभिमन्यू जाधव म्हणाले, गतवर्षीप्रमाणे याही वर्षी रब्बी व उन्हाळी हंगामातील पाण्याचे योग्य नियोजन व वाटप जलसंपदा विभागाकडून केले जाईल.

- राजेवाडी तलाव उपयुक्त पाणीसाठा 1632 द.ल.घ.फू. 
- सांडव्याची उंची पाच फूट तर लांबी 1158 मीटर 
- तलाव परिसरात व्हिक्‍टोरिया राणीसाठी बांधलेला पडझड झाला होता. मात्र तो वास्तु शास्त्राचा उत्तम नमुना असणारा बंगला आहे. 
- लाभक्षेत्रातील गावे राजेवाडी, लिंगविरे, पुजारवाडी, दिघंची, उंबरगाव (जि.सांगली) तर कटफळ, खवासपूर, चिकमहूद, अचकदाणी, वाकी, महूद(ता.सांगोला) 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com