
बाबासाहेब खरात म्हणाले, समाजाच्या संघटनेसाठी व एकीसाठी आठवले यांनी खूप प्रवास केला आहे, मात्र आजही समाजात एकी नाही. गटातटाचे राजकारण चुकीचे आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेने रामदास आठवले यांचा प्रवास सुरू आहे. सत्ता आणि प्रशासनात जा, हा त्यांचा संदेश आहे.
नातेपुते (सोलापूर) : समाजाच्या संघटनेसाठी व एकीसाठी केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक - अध्यक्ष रामदास आठवले यांनी खूप प्रवास केला आहे, मात्र आजही समाजात एकी नाही. गटातटाचे राजकारण चुकीचे आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेने रामदास आठवले यांचा प्रवास सुरू आहे. सत्ता आणि प्रशासनात जा, हा त्यांचा संदेश आहे, असे मत सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब खरात यांनी व्यक्त केले.
येथील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे आयोजन प्रदेश सचिव एन. के. साळवे यांनी केले होते. येथील राजश्री शाहू नगरमध्ये खाऊचे वाटप करण्यात आले व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष दयानंद धाईंजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्रदेश सचिव एन. के. साळवे, विशाल साळवे, लतीब नदाफ, प्रदीप धाईंजे, सागर बिचुकले, राहुल बागल, सुनील ढोबळे, समीर सोरटे, रेखा कांबळे, बाबासाहेब खरात उपस्थित होते.
या वेळी प्रदेश उपाध्यक्ष दयानंद धाईंजे म्हणाले, केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक - अध्यक्ष रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होत आहे. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पक्ष उभा केला आणि दलित समाजाबरोबरच इतर मागासवर्गीय समाजालाही न्याय मिळवून दिला.
प्रदीप धाईंजे म्हणाले, आज संघर्ष दिवस आहे. दलित समाजाला चांगले दिवस यावेत म्हणून आठवले यांनी संघर्ष केला आहे.
संयोजक एन. के. साळवे म्हणाले, रामदास आठवले यांनी संघर्ष केला आहे. संघर्षनायकाचा जन्मदिवस आज सर्व समाज साजरा करीत आहे. त्यांच्यामुळेच जातीवाद्यांवर दहशत बसली आहे. कुणावरही अन्याय होवो, आठवले हे त्या ठिकाणी गेलेले आपणास दिसून येतात. अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करीत आहोत हे आपले भाग्य आहे. रामदास आठवले यांनी समाजाच्या एकीसाठी प्रयत्न केले आहेत. कोणावरीलही अन्याय त्यांना सहन होत नाही.
संपादन : श्रीनिवास दुध्याल