दगडांना आकार देत जाते-खलबत्ते बनवणाऱ्या रमेशने झोपडीत राहून मिळवले "सेट'मध्ये यश 

Ramesh Dhotre
Ramesh Dhotre
Updated on

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट शहरातील कांदा बाजारामधील गावठाण जागेत झोपडीत राहून कुरूंद दगडापासून दळणाचे जाते, उखळ व खलबत्ते तयार करणाऱ्या, भटकंती करणाऱ्या पाथरूट समाजाच्या एका मुलाने मोठे यश मिळवले आहे. वडिलांना व्यवसायात मदत करीत, झोपडीत वास्तव्य करीत, अंधारात दिव्याच्या आधारे जिद्द व परिश्रमाच्या जोरावर सातत्यपूर्वक अभ्यास करून वाणिज्य विषयातील महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाला आहे. या सेट परीक्षेत एकूण 61 हजार 114 पैकी 4 हजार 114 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 

हलाखीच्या परिस्थितीत सेट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या या मुलाचे नाव आहे रमेश धोत्रे. हलसूर हे मूळ गाव असलेले रमेशचे वडील नागनाथ धोत्रे हे गेल्या 20 वर्षांपासून व्यवसायाच्या निमित्ताने भटकंती करत अक्कलकोटला वास्तव्यास आले. गावठाण जागेत झोपडीत वास्तव्य करीत व्यवसाय करून कुटुंबाचे कसेबसे ते पालनपोषण करतात. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे रमेश रात्री झोपडीत लाइटची सोय नसल्यामुळे कंदील व दिव्याच्या आधाराने अभ्यास करून व सकाळी पुन्हा काम करत त्याने हे यश संपादन केले आहे. 

लहानपणापासून जेमतेम आर्थिक परिस्थिती तसेच घरात शिक्षणाचा गंधही नाही, अशा परिस्थितीत रमेशने शिक्षणाचा ध्यास घेऊन आवड निर्माण केली. आपले हे अठरा विश्व दारिद्य्र हटवायचे तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे पक्के ठरवून आश्रमशाळा गाठून दहावी पास झाला. परत अक्कलकोटला येऊन खेडगी महाविद्यालय गाठले. पूर्ण बीकॉमची पदवी मिळेपर्यंत घरी विजेची सोय नाही.

छोट्याशा तंबू झोपडीत आपले पूर्ण कुटुंब आणि आपण ऊन-पावसाची तमा न बाळगता राहणे व आपले शिक्षण पुढे चालू ठेवण्याचे जिकिरीचे काम करावे लागे. दुपारपर्यंत महाविद्यालयात शिकणे व त्यानंतर पाच वाजेपर्यंत आपले जाते व खलबत्ते बनविण्याची कला पुढे नेऊन उत्पन्न मिळविणे तसेच सायंकाळी एका खासगी फायनान्समध्ये नऊ वाजेपर्यंत पिग्मी गोळा करणे हे नित्याचे काम सुरूच होते; जेणेकरून घरी आधार बनून आपले शिक्षण आपल्या उत्पन्नातून पूर्ण करून स्वावलंबी बनणे, हा मुख्य उद्देश होता. 

त्यानंतर एमकॉम करून पुण्यात एका खासगी बॅंकेत नोकरी पत्करली. तिथेच सेट परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात कॉमर्समध्ये सेट उत्तीर्ण होण्याची किमया साधली. यासाठी रमेशची मेहनत, जिद्द आणि निरंतर कठोर श्रम कामी आले. 

त्याच्या या यशाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. सुप्रिया पाटील, प्रा. श्‍यामला, प्रा. विश्वनाथ वाले, प्रा. आबाराव सुरवसे, प्रा. गणपतराव कलशेट्टी, मल्लिनाथ स्वामी, सचिन फुटाणे, मयूर स्वामी, नितीन फुटाणे, अतुल शिंदे आणि सहकारी मित्रमंडळींनी त्याचे अभिनंदन केले. 

शिक्षण पूर्ण करण्यासाठी चांगले घर व सर्व सोयीसुविधा हव्यातच असे काही नाही. आपली परिस्थिती बदलायची असेल तर प्रामाणिक प्रयत्न आणि निरंतर कष्ट हेच आवश्‍यक आहेत. चांगल्या यशाला शॉर्टकट सूत्र काही कामाचे नाही. आता येत्या काळात मी संधी मिळाल्यास महाविद्यालयात सेवा देणार आहे. आता मी पंचायत समिती, अक्कलकोट येथे आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहे. 
- रमेश धोत्रे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com