बार्शी पालिकेची निवडणूक जवळ आल्याने बाजार समितीची बदनामी सुरू : "यांनी' केला आरोप

प्रशांत काळे 
Monday, 14 September 2020

पनवेल येथे सापडलेला रेशनचा तांदूळ, गहू बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचा आहे. गुन्हे दाखल आहेत, याबद्दल मनगिरे म्हणाले की, रायगड जिल्हाधिकारी व पनवेल पोलिस ठाणे यांनी पूर्ण चौकशी करून हे धान्य कर्नाटक राज्यातील पाच तालुक्‍यांतील असल्याचे स्पष्ट केले आहे. बार्शीचाच काय पण याच्याशी महाराष्ट्राचाही संबध नाही, असे स्पष्टीकरण रावसाहेब मनगिरे यांनी केले. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 तालुके अन्‌ तीन जिल्ह्यांतून शेतमाल येतो. बाजार समितीने दोन वर्षात 10 कोटींची विकासकामे केली आहेत तर तीन बॅंकांमध्ये नऊ कोटींच्या ठेवी आहेत. कारभार पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने सुरू असून, विरोधक पालिका निवडणूक जवळ आल्याने राजकारणातून खोटे आरोप करून बाजार समितीला बदनाम करण्याचे काम करीत आहेत, असा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

पनवेल येथे सापडलेला रेशनचा तांदूळ, गहू बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचा आहे. गुन्हे दाखल आहेत, याबद्दल मनगिरे म्हणाले की, रायगड जिल्हाधिकारी व पनवेल पोलिस ठाणे यांनी पूर्ण चौकशी करून हे धान्य कर्नाटक राज्यातील पाच तालुक्‍यांतील असल्याचे स्पष्ट केले आहे. बार्शीचाच काय पण याच्याशी महाराष्ट्राचाही संबध नाही. बाजार समिती गाळे वाटप, रस्ते, विविध सेवासुविधा, बार्शीसह वैराग येथील जागांचे लेआउट, सुरक्षा व्यवस्था, दिवाबत्ती यांसारखी सुमारे 10 कोटींची कामे केली असून सुमारे 8 कोटी रुपये खर्चही केले आहेत. तीन कोटी रुपये कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचे दिले आहेत. दोन वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती, असा सवाल त्यांनी या वेळी केला. 

बाजार समितीचा 2019-20 मध्ये सात कोटी सेस मिळाला असून 46 लाख 63 हजार रुपये शिल्लक आहेत. 17 कोटी रुपये संपवून तिजोरीत खडखडाट केला, असे म्हणणाऱ्यांनी प्रशासक पदावर असताना काय केले, असा प्रश्न निर्माण होतो. 2016-17 मध्ये केवळ 3 कोटी 65 लाख सेस जमा झाला होता. 17 कोटी कोठून आले? समितीवर प्रशासक असताना 2016-17 मध्ये गहू 44 हजार 581 क्विंटल तर साळी 17 हजार 572 क्विंटलची आवक झाली होती. विरोधकांनी प्रवेशद्वाराजवळच ठाण मांडावे अन्‌ तपासूनच शेतमाल बघावा, त्यांची सोय समिती करेल, असेही मनगिरे या वेळी म्हणाले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raosaheb Mangire alleged that the market committee is being discredited as the Barshi municipal elections are approaching