पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी अन्‌ दुकानदारांची केली जाणार रॅपिड ऍटीजेन टेस्ट 

भारत नागणे 
Wednesday, 9 September 2020

कोरोना चाचणी केल्यानंतर काही व्यापारी अथवा त्यांच्या दुकानातील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास अशा रुग्णांना त्यांच्या घरी उपचार करण्याची सोय करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना अशी सोय नाही, अशा रुग्णांना नगरपरिषदेच्या 65 एकर येथील कोविड केअर सेंटर अथवा एमआयटी कॉलेज येथे उपचाराची सोय केली जाईल, अशी माहिती ही मुख्याधिकारी श्री. मानोरकर यांनी दिली. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू लागला आहे. संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य आणि नगरपालिकेने अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व व्यापारी आणि दुकानदारांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी आज दिली. 
पंढरपूर शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांची बैठक आज माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सर्वानुमते चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीला उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते. 
पंढरपूर शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा रॅपिड अँटीजेन टेस्टकरुन घेण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निर्देश दिले आहेत. त्यांच्या या निर्देशानुसार व्यापाऱ्यांच्या रॅपिड टेस्ट घेण्यात येणार आहेत. कोरोना चाचणी केल्यानंतर काही व्यापारी अथवा त्यांच्या दुकानातील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास अशा रुग्णांना त्यांच्या घरी उपचार करण्याची सोय करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना अशी सोय नाही, अशा रुग्णांना नगरपरिषदेच्या 65 एकर येथील कोविड केअर सेंटर अथवा एमआयटी कॉलेज येथे उपचाराची सोय केली जाईल, अशी माहिती ही मुख्याधिकारी श्री. मानोरकर यांनी दिली. 
बैठकीला शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पद्मकुमार गांधी, विजय कुमार परदेशी, शैलेंद्र बजाज, गोविंद गाडे, अजित सावळे, राजगोपाल भट्टड, सचिन म्हमाणे, राजकुमार गांधी, राहुल मोहिते, रवींद्र वांगीकर, जयसिंग भालके, महेश गानमोटे, नगरसेवक संजय निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डांगे, नवनाथ रानगट आदी उपस्थित होते. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid antigen test will be conducted on all traders and shopkeepers in Pandharpur city