भावी वकिलांची फेरपरीक्षा ! बार कौन्सिलचे विद्यापीठास पत्र; 4 ते 8 जानेवारीपर्यंत परीक्षेचे नियोजन

तात्या लांडगे
Friday, 1 January 2021

बार कौन्सिलच्या पत्रानुसार परीक्षेचे नियोजन
बार कौन्सिलच्या पत्रानुसार 'एलएलबी' अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मागील सत्रातील गुण आणि अंतर्गत मूल्यमापानाचे गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते.
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सोलापूर : कोरोना काळात उच्च महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अशक्‍य होते. त्यामुळे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मागील गुणवत्तेवरून उत्तीर्ण करण्यात आले. तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. मात्र, 'एलएलबी'च्या विद्यार्थ्यांसाठी ही पध्दत न वापरता त्यांची नियमित परीक्षा घ्यावी, असे पत्र बार कौन्सिलने विद्यापीठांना दिले. त्यानुसार पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने 'एलएलबी' अभ्यासक्रमासाठी असलेल्या अडीचशे विद्यार्थ्यांची परीक्षा 4 ते 9 जानेवारीदरम्यान घेण्याचे नियोजन केले आहे.

 

बार कौन्सिलच्या पत्रानुसार परीक्षेचे नियोजन
बार कौन्सिलच्या पत्रानुसार 'एलएलबी' अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मागील सत्रातील गुण आणि अंतर्गत मूल्यमापानाचे गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते.
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

 

भावी वकिलांना, ज्यांनी प्रथम, तृतीय, पाचवे आणि सातवे सेमिस्टर उत्तीर्ण केले आहे, त्यांचे मागील परीक्षेतील गुण पाहून त्यांना सरसकट उत्तीर्ण करण्यात आले होते. त्यामध्ये मागील सेमिस्टरच्या एकूण गुणातील 50 टक्‍के तर चालू वर्षातील इंटरनल परीक्षेतील गुणातील 50 टक्‍के गुण दिले होते. मात्र, वकिली क्षेत्रात येण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती असणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर बार कौन्सिलने विद्यापीठांच्या गुणदान पध्दतीवर हरकत घेत 'एलएलबी'च्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली होती. तीन व पाच वर्षाच्या 'एलएलबी' अभ्यासक्रमाची सोलापुरात तीन महाविद्यालये असून त्याअंतर्गत अडीचशे विद्यार्थी वकिलीचे शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमाच्या सर्वच विद्यार्थ्यांची आता ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.

द्वितीय व अंतिम वर्षाची परीक्षा लांबण्याची शक्‍यता
प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अजूनही संपलेली नाही. त्यामुळे आता द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह संलग्नित 108 महाविद्यालयांमधील सुमारे 54 विद्यार्थ्यांची परीक्षा 13 जानेवारीपासून घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. मात्र, संक्रात, किंक्रांतमुळे परीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्‍यता असून 18 जानेवारीपासून परीक्षेला सुरवात होऊ शकते, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Re-exam of future lawyers! Letter of the Bar Council to the University; Exam planning from 4 to 8 January