मोहिते पाटील गटाच्या बंडखोर सदस्यांची 10 नोव्हेंबरला सुनावणी

प्रमोद बोडके
Monday, 2 November 2020

कॉंग्रेसची भूमिका गुलदस्त्यात 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत कॉंग्रेसच्याही जिल्हा परिषद सदस्यांनी बंडखोरी केलेली आहे. या बंडखोरांच्या विरोधात कॉंग्रेसने सुरुवातीला अर्ज दिला. नंतर मात्र कॉंग्रेसने हे प्रकरण शांत केले. आता कॉंग्रेस बंडखोरांच्या बाबतीत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारां विरोधात बंडखोरी करणारे माळशिरस तालुक्‍यातील मोहिते-पाटील गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांची सुनावणी पुन्हा एकदा सुरु झाली आहे. या सहा बंडखोर सदस्यांना अपात्र करावे अशी मागणी गटनेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. उच्च न्यायालयाने बंडखोर सदस्यांची याचिका फेटाळल्यानंतर आता या सदस्यांच्या अपात्रतेबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज या सुनावणीची तारीख निश्‍चित केली आहे. मंगळवारी (ता. 10) दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे या बंडखोर सदस्यांची सुनावणी होणार आहे. माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या स्वरुपाराणी मोहिते-पाटील, शितलादेवी मोहिते पाटील, अरुण तोडकर, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले आणि गणेश पाटील या सदस्यांनी राष्ट्रवादीचा व्हिप डावलत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rebel members of Mohite Patil group to be heard on November 10