esakal | निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! मास्क अन्‌ सोशल डिस्टन्सिंगमुळे प्रभाग सातमधील कोरोना थांबतोय
sakal

बोलून बातमी शोधा

1Corona_20akola_2001_1.jpg

प्रभागातील ठळक बाबी...

  • एकूण 578 जणांना झाली बाधा
  • आतापर्यंत 531 रुग्ण झाले बरे
  • 30 व्यक्‍तींचा कोरोनामुळे झाला मृत्यू
  • प्रभागातील 17 रुग्णांवर सुरु आहेत उपचार

निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! मास्क अन्‌ सोशल डिस्टन्सिंगमुळे प्रभाग सातमधील कोरोना थांबतोय

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : नवी पेठ, चौपाड, निराळे वस्ती, पंजाब व मंगळवेढा तालिम, अवंती नगर, मुरारजी पेठ, अभिषेक नगर, यश नगर अशा गजबलेल्या नगरांमधून व पेठांमधून आता कोरोना हद्दपार होऊ लागला आहे. प्रभाग क्र. सातमध्ये आता केवळ 17 रुग्ण उरले असून उर्वरित रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सण-उत्सवात व त्यापूर्वी लॉकडाउन काळात नागकरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्‍य झाले आहे.

शहरातील रुग्णसंख्या आता दहा हजारांच्या उंबरठ्यावर आहे. त्यापैकी बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शहरातील एकूण नऊ हजार 632 पैकी सर्वाधिक सहा हजार 372 रुग्ण झोन क्रमांक एक, दोन, पाच आणि सातमध्ये आढळले आहेत. तर 535 पैकी 326 मृत्यू याच झोनमध्ये झाले आहेत. दुसरीकडे 15 नागरी आरोग्य केंद्रांच्या तुलनेत रामवाडी आणि साबळे नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या परिसरात सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक मृत्यूची नोंद झाल्याचेही समोर आले आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शहरातील 362 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. प्रभाग सातमधील नगरसेवक अमोल शिंदे, देवेंद्र कोठे, मंदाकिनी पवार, सारिका पिसे यांनी जनजागृजी व धान्य, मास्कवाटप अशा स्वरुपात मदत करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे सातत्याने आवाहन केले. गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव यासह मोठ्या सण- उत्सवात मिरवणुका न काढता गर्दी टाळली. जनतेने केलेला कोरोनामुक्‍तीचा संकल्प आणि नियमांचे तंतोतंत पालन, पोलिस, महापालिका प्रशासनाच्या सहकार्यातून हा प्रभाग लवकरच कोरोनामुक्‍त होईल, असा विश्‍वासही नगरसेवकांनी व्यक्‍त केला आहे.


नागरिक, व्यापारी, महापालिका, पोलिस प्रशासनाचे यश
नवी पेठ, मुरारजी पेठ, चौपाडसह अन्य परिसरातील नागरिकांसह व्यावसायिक, व्यापाऱ्यांमध्ये जागृती केली. धान्य, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. बहुतांश नागरिकांची ऍन्टीजेन टेस्ट व्हावी म्हणून मोहीम घेतली. आता नागरिकांनी स्वत: नियमांचे पालन करायला सुरवात केल्याने गजबजलेल्या या प्रभागातील कोरोना आटोक्‍यात येऊ लागला आहे.
- अमोल शिंदे, नगरसेवक

प्रभागातील 12 हजार नागरिकांची स्व:खर्चातून कोरोना टेस्ट

प्रभाग सातमध्ये 22 एप्रिलपासून प्रभागातील 12 हजार नागरिकांची स्व:खर्चातून कोरोना टेस्ट केली. त्यानंतर शहरात सर्वत्र हा प्रयोग राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, अरविंदधाम पोलिस वसाहत, बॅंक कर्मचारी, व्यापारी, व्यावसायिक व शासकीय सेवेतील कर्मचारी या प्रभागात मोठ्या प्रमाणावर राहातात. प्रामुख्याने त्यांची टेस्ट करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे प्रभागात मोठा गजबजलेला असतानाही कोरोना वाढला नाही. दोन हजार नागरिकांना 9 एप्रिलला धान्य वाटप केले. तसेच मास्क, सॅनिटायझर, आर्सेनिक गोळ्यांचेही वाटप केल्या. रक्‍ताचा तुटवडा भासणार नाही, या सामाजिक बांधिलकीतून दोनदा रक्‍तदान शिबिरेही घेतली. महापालिका प्रशासन, खासगी डॉक्‍टरांविरुध्द आवाज उठविल्यानंतर त्यांचेही सहकार्य मिळू लागले. क्‍वारंटाईन सेंटरला भेटी देऊन संशयितांसह रुग्णांना धीर दिला आणि त्याठिकाणी सोयी- सुविधा देण्याच्या सूचना केल्या. 
- देवेंद्र कोठे, नगरसेवक


प्रभागातील ठळक बाबी...

  • एकूण 578 जणांना झाली बाधा
  • आतापर्यंत 531 रुग्ण झाले बरे
  • 30 व्यक्‍तींचा कोरोनामुळे झाला मृत्यू
  • प्रभागातील 17 रुग्णांवर सुरु आहेत उपचार