
ठळक बाबी...
सोलापूर : एसटी स्टॅण्डसमोरील पेट्रोल पंप परिसरातील हॉटेल संतोष लॉजवर पोलिसांनी छापा टाकला. तत्पूर्वी, पोलिसांनी एक बोगस ग्राहक आत पाठवून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री केली. त्यावेळी एजंट महिला आणि मालकिणीसह सोलापुरातील एका तरुणीला ताब्यात घेतले. त्यानंतर ज्यादा पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तरुणीची सुटका केल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.
वेश्या व्यवसाय वाढतोय
शहरात हॉटेल तथा लॉज म्हणून परवानगी घेतलेल्या काही हॉटेलमध्ये (लॉज) वेश्या व्यवसाय वाढू लागल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातील सर्व हॉटेल, लॉजची माहिती संकलित करुन तसेच ज्या ठिकाणी कारवाई झाली, अशा अपार्टमेंटचीही माहिती पोलिसांनी घेतली होती. त्या सर्व ठिकाणांची अचानकपणे तपासणी करण्याचे नियोजनही झाले. मात्र, त्यानुसार पुढे काहीच कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर शहरात अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची चर्चा आहे. त्यावर आता पोलिस आयुक्त अंकुश शिंदे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
महिला एजंटाच्या माध्यमातून हॉटेल संतोष लॉजमध्ये कुंटणखाना चालविला जात होता. 66 वर्षीय कुसूम मारे या पैशाचे अमिष दाखवून तरुणी, महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होत्या. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून खात्री केली आणि 11 नोव्हेंबला (बुधवारी) छापा टाकला. अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक पी. एस. क्षिरसागर यांनी केली. या पथकात पोलिस हवालदार राजकुमार बंडगर, महादेव बंडगर, शत्रुराणी इनामदार, अर्चना गवळी, ज्योती मोरे, नफिसा मुजावर, तृत्पी मंडलीक व दादा मोरे आदींचा समावेश होता.
ठळक बाबी...