"खाऊ नको, मास्क द्या'! प्रजासत्ताकदिनी वेळापुरातील शाळांनी केले दानशूरांकडे आवाहन 

अशोक पवार 
Tuesday, 26 January 2021

इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना, वेळापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळापूर मुली यांच्या वतीने दानशूर व्यक्ती, संस्था यांना "खाऊ नको, मास्क द्या' असे आवाहन करण्यात आले.

वेळापूर (सोलापूर) : इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना, वेळापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळापूर मुली यांच्या वतीने दानशूर व्यक्ती, संस्था यांना "खाऊ नको, मास्क द्या' असे आवाहन करण्यात आले. 

ग्रामपंचायत वेळापूरच्या पटांगणामध्ये सरपंच विमल जानकर यांच्या हस्ते आणि उपसरपंच जावेद मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मंडले, माजिद मुलाणी आदींच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी शालेय मुलांना या वर्षी प्रजासत्ताक दिनी खाऊ वाटप करण्याऐवजी मास्क आणि सॅनिटायझरची सुविधा देण्याबाबत आवाहन करण्यात आले. या वेळी सरपंच जानकर यांनी सर्वच जिल्हा परिषद शाळांना मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला. 

तलाठी कार्यालय येथेही खाऊ नको मास्क द्या, या असे आवाहन वेळापूर मंडल आणि तलाठी कार्यालयासमोर झालेल्या ध्वजवंदन समारंभ प्रसंगी करण्यात आले. येथील ध्वजवंदन मंडळ अधिकारी विलास रणसुभे यांच्या हस्ते झाले. या वेळी तलाठी राघवेंद्र तोरके यांच्यासह कर्मचारी नवनाथ गेजगे, दत्ता भाकरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

कोरोना संकट काळात साजरा झालेला प्रजासत्ताक दिन शालेय विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत आणि मोजक्‍या नागरिकांच्या उपस्थितीत साजरा झाला. वेळापूर मुलींच्या शाळेतील या कार्यक्रमात पंचायत समिती सदस्या रेणुकादेवी माने - देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा ननवरे, मारुती क्षीरसागर, सदस्य विनोद भगत, भारत भगत, राजू घाडगे आणि शिक्षक उपस्थित होते. "खाऊ नको, मास्क द्या' या शिक्षकांनी केलेल्या आवाहनास वेळापूर परिसरातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 

येथील जिल्हा परिषद मुलांच्या केंद्र शाळेत जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन धाइंजे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी केंद्रप्रमुख सायरा मुलाणी, मुख्याध्यापक रमेश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य साठे, नवनाथ वाघमारे आदींसह शिक्षक उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic Day was celebrated with enthusiasm in Velapur