शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना करणार विनंती : दूध संघ अध्यक्ष दिलीप माने, पुरग्रस्त गावांची पाहणी 

प्रमोद बोडके
Sunday, 18 October 2020

भीमा-सिना नदीला आजपर्यंत कधीही न आलेला महापूर या अतिवृष्टीमुळे व धरणातून पाणी सोडल्यामुळे आला आहे. महापुराने गावांचे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे संपर्क तुटला पिकांचे फार मोठे नुकसान झाले. बांध फुटल्याने जमीनीचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या इलेक्‍ट्रीक मोटारी वाहुन गेल्या आहेत. महापुरामुळे शेतकऱ्यांची फार भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या नुकसानीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण दिली आहे. 
- दिलीप माने, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा दूध संघ 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 13 व 14 ऑक्‍टोबरला झालेल्या अतिवृष्टीमध्ये व अतिवृष्टीमुळे भिमा, सिना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नूकसान झाले आहे. या नुकसानीमुळे तुम्ही खचून जाऊ नका. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे. या परिसरात झालेल्या नुकसानीची माहिती मी स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देतो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जास्तीत जास्त मदत करावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो असा विश्‍वास सोलापूर जिल्हा सहकारी दूध प्रक्रिया संघाचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप माने यांनी दिला. 

माजी आमदार माने यांनी आज उत्तर सोलापूर तालुक्‍यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. बेलाटी, पाथरी, तेलगाव, डोणगाव, नंदुर या गावांना भेटी देवुन पुरग्रस्त स्थितीची पहाणी करुन येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उद्या (सोमवार) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. येथील परिस्थितीची, नुकसानीची माहिती आपण त्यांच्या पर्यंत पोहचवू. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत तत्काळ जाहीर करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी उध्दव बंडगर, शिवाजी पाटील, गणपत बचुटे, सुदर्शन पाटील, काशीनाथ गौडगुंडे, संभाजी पाटील, माळप्पा बंडगर, मोहन लामतुरे, शहाजी सुरवसे, विठ्ठल लामतुरे, चंद्रकांत मसलखांब, अर्जुन गायकवाड, प्रकाश गुरव, श्रीकांत बंडगर, तानाजी पाटील, गणपत जाधव, दिलीप पाटील, मन्सूर नदाफ, सोमनाथ बचुटे, साईबाबा नदाफ आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Request to CM for help of farmers: Milk Association President Dilip Mane, inspection of flood affected villages