"राजीव गांधी सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी'कडून "स्वेरी'ला 45 लाखांचा संशोधन निधी मंजूर ! 

Sweri
Sweri

पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी कमिशन (आरजीएसटीसी) कडून 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे (स्वेरी) संस्थापक - सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली. 

येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अंतर्गत असलेल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट अर्थात संशोधन विभागामार्फत संस्थेचे संस्थापक - सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी पायलट प्रोजेक्‍ट फॉर एक्‍स्फ्लोरिंग द ऍप्लिकेशन्स अँड डेव्हलपिंग बिझनेस मॉडेल्स फॉर युटिलायझेशन ऑफ ड्रोन लाईक मिनी एअर व्हेईकल्स फॉर ऍग्रिकल्चरल ऍप्लिकेशन्स या संशोधन प्रकल्पाबाबत प्रस्ताव सादर केलेला होता. त्या प्रस्तावाला तेथील समितीने अभ्यास करून हिरवा कंदील दाखविला असून, 45 लाख रुपये निधी मंजुरीचे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. 

शेतीच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. शेतीतील विविध महत्त्वपूर्ण कामे जसे ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करणे, ड्रोनच्या सहाय्याने पिकांच्या वाढीतील व उत्पादन वाढीतील अडचणी शोधणे, कीड नियंत्रण करणे, ड्रोनमध्ये बसवलेल्या डिव्हाईसच्या आवाजाने पक्ष्यांना परतवून लावणे, अवघड ठिकाणी जंगल वाढीसाठी बियाणे विस्कटणे, ड्रोनच्या विविध कामांमधील कार्यक्षमता वाढवणे आदी कामे करता येऊ शकतात. 

स्वेरीमध्ये संशोधन विभागाची स्वतंत्र निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत जवळपास 750 लाख (साडेसात कोटी) पेक्षा जास्त निधी मिळाला असून, आता यामध्ये या 45 लाख रुपये निधीची भर पडली आहे. पूर्वी मिळालेल्या सुमारे सात कोटींच्या निधीमधून महाविद्यालयात विविध संशोधन सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पाच विशिष्ट संशोधन प्रयोगशाळांचा समावेश आहे. त्याचबरोबर भाभा अणुशक्ती केंद्रासोबत झालेल्या करारातून ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. आता संशोधन निधी मंजूर झालेल्या या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक म्हणून शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार व स्वेरीचे संस्थापक - सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे हे आहेत, तर सहाय्यक म्हणून संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे डॉ. आर. एस. पवार हे आहेत. 

डॉ. प्रशांत पवार यांना भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून नुकताच विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर्स ऍवॉर्ड प्रथम क्रमांकाने मिळाला होता. संशोधन निधी मिळाल्याबद्दल डॉ. प्रशांत पवार व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांनी अभिनंदन केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com